सोमेश्वर रिपोर्टर टीम----
राजगड : मिनल कांबळे
राजगड तालुक्यात पहिल्यांदाच शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेली 'राजगड अधिकारी प्रीमियर लीग' क्रिकेट स्पर्धा पानशेत टुरिझम असोसिएशन, पुणे यांच्या सौजन्याने गुरुवारी (२८ मे) रोजी कादवे येथे उत्साहात पार पडली.
शासकीय कामाच्या व्यापातून थोडा विरंगुळा मिळावा आणि विविध विभागांतील अधिकाऱ्यांमध्ये समन्वय साधत या क्रिकेट स्पर्धेत राजगड पोलीस स्टेशन संघ, राजगड महसूल संघ (तहसील कार्यालय), वनविभाग संघ, ग्रामसेवक संघ, पत्रकार संघ, कृषी संघ, पंचायत समिती संघ, जलसंपदा संघ, पानशेत टुरिझम असोसिएशन संघ, महावितरण संघ तसेच कादवे ग्रामस्थ संघ यांनी सहभाग घेतला.
अधिकारी व कर्मचाऱ्यांनी खेळाचा मनमुराद आनंद लुटत अंतिम फेरीत उत्कृष्ट कामगिरी करत वेल्हा पोलीस संघाने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकाविला. स्पर्धेचे नियोजन पानशेत टुरिझम असोसिएशनचे कार्याध्यक्ष योगेश सपकाळ यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्योजक अनंता (आण्णा) निवंगुणे यांनी केले. आयोजनासाठी शैलेश जागडे, शिवाजी मराठे, अशोक जामदार, निखिल हगवणे, मारुती राऊत, प्रसाद निवंगुणे, प्रतीक जाधव व कुणाल मराठे यांनी परिश्रम घेतले. पंच म्हणून विनायक बीरामने, गोपी सुर्वे, संजय सुर्वे, सोपान जागडे व नाना जागडे यांनी काम पाहिले. स्पर्धेनंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून पाटबंधारे विभाग मुठा कालवा उपअभियंता मोहन भदाणे, राजगडचे नायब तहसीलदार मयूर बनसोडे तसेच वेल्हा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक किशोर शेवते उपस्थित होते.
