सोमेश्वर रिपोर्टर टीम----
बारामती : प्रतिनिधी
पतीच्या निधनानंतर एकट्या राहत असलेल्या विधवा महिलेचा गैरफायदा घेत तिच्याकडे वारंवार शरीरसुखाची मागणी करणे, घरात अनधिकृतपणे प्रवेश करून विनयभंग करणे, फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करणे तसेच मारहाण केल्याप्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात येथील नगरसेवक किशोर आप्पासाहेब मासाळ (रा. सूर्यनगरी, जळोची, बारामती) याच्या विरोधात गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका महिलेने याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार किषोर आप्पासाहेब मासाळ (रा. सूर्यनगरी, जळोची, ता. बारामती) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी महिलेच्या तक्रारीनुसार, 13 फेब्रुवारी 2026 ते 25 मे 2026 या कालावधीत आरोपीने ओळखीचा फायदा घेत वारंवार तिच्या राहत्या घरी प्रवेश केला. पतीच्या निधनानंतर ती एकटी राहत असल्याचा गैरफायदा घेत आरोपीने वेळोवेळी शरीरसुखाची मागणी केली. तसेच अंगाला स्पर्श करून आणि अश्लील वर्तन करून तिच्या मनात लज्जा निर्माण होईल असे कृत्य केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याशिवाय, "मी पुढारी आहे, माझ्या मोठ्या ओळखी आहेत. तुला सुखाने जगू देणार नाही, खोट्या गुन्ह्यात अडकवीन," अशा शब्दांत धमकावल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. आरोपीने महिलेचे फोटो आपल्या मोबाईलमध्ये असल्याचे सांगून ते सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी दिली. तसेच बारामतीतील उद्योजकांना ब्लॅकमेल करून पैसे उकळून देण्याचा दबाव टाकल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, आरोपीने तिचा वारंवार पाठलाग केला तसेच हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाणही केली. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या महिलेने अखेर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. विशेष म्हणजे मासाळ हा येथील राष्ट्रवादीचा नगरसेवक आहे. नुकत्याच झालेल्या निवडणूकीत तो बिनविरोध निवडून आला होता. त्याच्याकडून हे कृत्य केल्याने बारामतीत खळबळ उडाली आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात बीएनएस कलम 332 (c), 74, 75, 78, 115(2), 352 आणि 351(2)(3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
