सोमेश्वर रिपोर्टर टीम----
राजगड : मिनल कांबळे
राजगड पंचायत समिती प्रशासनाकडून नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत अहिल्यानगर व डांगेखिंड-शिरकोली येथील ग्रामस्थांनी शुक्रवारी (२९ मे) गटविकास अधिकारी संजय ढमाळ यांना निवेदन देत तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच, प्रलंबित प्रश्नांवर तातडीने तोडगा न काढल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनानुसार, शिरकोली ग्रामपंचायत हद्दीतील डांगेखिंड वस्तीवर १५ ऑक्टोबर २०२५ रोजी एक दुर्दैवी घटना घडली होती. संरक्षक कठडा नसलेल्या विहिरीतून पाणी भरत असताना एका महिलेचा तोल जाऊन ती विहिरीत पडल्याने मृत्यू झाला होता. या गंभीर घटनेची माहिती पंचायत समिती प्रशासनाला देण्यात आली होती. मात्र, घटनेनंतर तब्बल १३ दिवस कोणतीही चौकशी अथवा पाहणी करण्यात आली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
या घटनेच्या निषेधार्थ २९ ऑक्टोबर २०२५ रोजी ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन केले होते. त्यावेळी गटविकास अधिकाऱ्यांनी संबंधित विहिरीला संरक्षक कठडा उभारणे, सुरक्षित पाणी उपसा व्यवस्था निर्माण करणे तसेच कामातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सहा महिने उलटूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
दरम्यान, गेल्या आठ दिवसांपासून अहिल्यानगर परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिकांसह जनावरांनाही पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून कोणतीही प्रभावी उपाययोजना होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी निवेदनात केला आहे. डांगेखिंड येथील विहिरीच्या सुरक्षेचा प्रश्न आणि अहिल्यानगरमधील पाणीपुरवठ्याची समस्या सोमवार (१ जून) पर्यंत मार्गी न लागल्यास राजगड पंचायत समिती कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
यावेळी मारुती मरगळे, संतोष साळेकर, राहुल मरगळे, भाऊसाहेब शिंदे, संतोष ढेबे, धोंडिबा मरगळे, भाऊ मरगळे, बाळू मरगळे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. या गंभीर प्रश्नांवर पंचायत समिती प्रशासन कोणती भूमिका घेते आणि ग्रामस्थांच्या मागण्यांवर काय उपाययोजना करते, याकडे आता संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
