सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
कर्तव्य बजावताना पोटातील यशाची आग कधीही विझू देऊ नका. कष्ट, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यश नक्की मिळते. जबाबदारीची जाणीव ठेवून प्रामाणिकपणे काम करा, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य करण खलाटे यांनी केले. वाघळवाडी येथे ग्रामपंचायत व समस्त ग्रामस्थांच्या वतीने आयोजित नागरी सत्कार समारंभात ते बोलत होते.
पोलीस व सैन्य दलात निवड झालेले युवक-युवती, उच्च शिक्षण पूर्ण केलेले मान्यवर, तसेच सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींचा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थी यांचा यावेळी नागरी सत्कार समारंभ प्रसंगी गौरव करण्यात आला.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील म्हणाले, अंगावरील वर्दी ही केवळ वर्दी नसून समाजाप्रती असलेल्या जबाबदारीचे प्रतीक आहे. प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणे हीच खरी सेवा आहे.
मुंबई शहर पोलीस दलात निवड झालेल्या पायल अनिता संजय शिंदे व काजल अनिता संजय शिंदे या सख्या भगिनींचा विशेष सत्कार करण्यात आला. अत्यंत साध्या व कष्टकरी कुटुंबातून पुढे येत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवत कुटुंबासह संपूर्ण वाघळवाडीचे नाव उज्ज्वल केले. त्यांच्या सन्मानार्थ गावातून घोड्यावर बसवून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.
कार्यक्रमादरम्यान डॉ. मृणाली नामदेव जाधव व डॉ. प्राजक्ता योगेश यादव यांचा पीएच.डी. पदवी प्राप्तीबद्दल विशेष गौरव करण्यात आला. तसेच भारतीय सैन्य दलात निवड झालेल्या मयुर गणेश महापुरे तर मुंबई बेस्ट मध्ये निवड झालेबद्दल सौरभ सावंत यांचा सत्कार करण्यात आला.गावातील व परिसरातील तब्बल २२ युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल अमित रामचंद्र शिंदे यांना "कर्तृत्ववान युवा सन्मान" प्रदान करण्यात आला.
विवेकानंद अभ्यासिकेचे गणेश सावंत यांना शिंदे भगिनींसह आजपर्यंत सुमारे ४०० विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व विविध भरती प्रक्रियेसाठी मार्गदर्शन केल्याबद्दल गौरविण्यात आले. तसेच कै.सिद्धांत जगताप यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या बालवाचनालयासाठी योगदान देणाऱ्या साद संवाद स्वच्छता ग्रुप, वाणेवाडीच्या सदस्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. मैदानी प्रशिक्षणासाठी मोलाचे मार्गदर्शन केल्याबद्दल अंकुश दोडमिसे व मयुर कोळपे यांचाही विशेष गौरव करण्यात आला.
याशिवाय एस.एस.सी. बोर्ड परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन करणारे विद्यार्थी, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थिनी तसेच सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य करण खलाटे होते. यावेळी पंचायत समिती सदस्य दिग्विजय जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष केशव जाधव,संचालक कौस्तुभ चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक मयुरी सावंत,सरपंच अॅड. हेमंत गायकवाड, उपसरपंच जितेंद्र सकुंडे, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष सतिश सकुंडे, धोंडीराम जाधव, विजय सावंत, अविनाश सावंत,सदस्य गणेश जाधव, तुषार सकुंडे,सुचेता साळवे,शशिकांत जेधे,डी.वाय.जगताप,नितीन ननवरे,विशाल हंगिरे,बाळकृष्ण भोसले,संजय शिंदे,प्रविण सावंत आदी मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच अॅड. हेमंत गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन तुषार सकुंडे यांनी केले तर आभार उपसरपंच जितेंद्र सकुंडे यांनी मानले.
