Sharad King Pomegranate Variety l शरदकिंग’ डाळिंबाला शासनमान्यतेच्या दिशेने मोठे पाऊल; करण खलाटे यांच्या भेटीनंतर कृषिमंत्री भरणे यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती :  प्रतिनिधी 
डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची ठरणारी ‘शरदकिंग’ डाळिंब वाणाला शासनमान्यता मिळवून देण्याच्या दृष्टीने प्रयत्नांना गती मिळाली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार जिल्हा परिषदेचे सदस्य करण खलाटे यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन ‘शरदकिंग’ डाळिंब वाणाला शासनमान्यता तसेच शासकीय योजनांमधून अनुदान मिळवून देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी बारामती तालुक्यातील कांबळेश्वर व परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर ‘शरदकिंग’ डाळिंब वाणाची लागवड करून उत्पादनात लक्षणीय वाढ साधली असून चांगला आर्थिक लाभ मिळविल्याची माहिती कृषिमंत्र्यांना देण्यात आली. या वाणाची उत्पादनक्षमता, फळांची गुणवत्ता आणि बाजारपेठेतील मागणी याबाबतही सविस्तर माहिती सादर करण्यात आली.
अल्पावधीतच शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय ठरलेल्या ‘शरदकिंग’ वाणाला शासनमान्यता मिळाल्यास राज्यभरातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. तसेच विविध शासकीय योजनांमधून अनुदानाचा लाभ उपलब्ध झाल्यास डाळिंब शेतीला अधिक चालना मिळेल, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला.
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी हा विषय गांभीर्याने ऐकून घेत शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक बाबींचा सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन दिले. शासनमान्यता आणि अनुदानाबाबत पुढील कार्यवाहीसाठी अनुकूलता दर्शविल्याची माहिती बैठकीनंतर देण्यात आली.
यावेळी ‘शरदकिंग’ डाळिंब वाणाचे जनक विठ्ठलराव भोसले, पुणे जिल्हा परिषद सदस्य करण खलाटे तसेच परिसरातील प्रगतिशील शेतकरी उपस्थित होते.
‘शरदकिंग’ वाणाच्या माध्यमातून डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे आणि या वाणाला व्यापक स्तरावर मान्यता मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे कृषिमंत्री भरणे यांनी यावेळी सांगितले.
To Top