Baramati Sugar Cane l थोपटेवाडीच्या शेतकरी कुटुंबाची दैदिप्यमान कामगिरी; प्रति एकरी १०२ टन ऊस उत्पादनाचा विक्रम

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
थोपटेवाडी ता. बारामती येथीलया प्रगतिशील शेतकरी सुनिता जगन्नाथ थोपटे यांनी चालू गळीत हंगामात प्रति एकरी तब्बल १०२ टन ऊस उत्पादन घेऊन उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
        पणदरे ता. बारामती स्वप्नपूर्ती मंगल कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माळेगाव कारखान्याचे मा. अध्यक्ष केशव जगताप, उपाध्यक्षा संगीता कोकरे, संचालक योगेश जगताप, स्वप्नील जगताप, मा. सभापती अविनाश गोफणे, डॉ. अंकुश चोरमले आदी मान्यवर उपस्थित होते. थोपटे यांनी विक्रमी उत्पादनामुळे परिसरात त्यांचे कौतुक होत असून शेतकरी वर्गासाठी त्यांनी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.
या यशामागे थोपटे कुटुंबीयांचे अथक परिश्रम, आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब आणि योग्य नियोजन यांचा मोठा वाटा आहे. तसेच पणदरे पंचक्रोशी शेतकरी मंडळ व गन्ना मास्टर अॅग्रो इंडस्ट्रीज यांचे मार्गदर्शन लाभले. योगेश थोपटे यांचे वडील कै. जगन्नाथ थोपटे हे हाडाचे शेतकरी म्हणून ओळखले जात होते. डाळिंब फळबाग क्षेत्रात त्यांनी विशेष नाव कमावले होते. शेतीविषयीची आवड, कष्टाची तयारी आणि जिद्दीचे संस्कार त्यांनी आपल्या कुटुंबाला दिले. आज ते हयात नसले तरी त्यांच्या विचारांचे आणि मेहनतीचे हेच खरे फळ असल्याची भावना थोपटे कुटुंबीयांनी व्यक्त केली.

थोपटे कुटुंबीयांची ही कामगिरी थोपटेवाडी गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी ठरली आहे. त्यांच्या यशामुळे परिसरातील इतर शेतकऱ्यांनाही प्रेरणा मिळणार असून भविष्यात अधिकाधिक शेतकरी ऊस उत्पादनात शंभरी पार करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
To Top