Bhor Breaking l दौंडच्या केडगाव गर्भलिंगनिदान प्रकरणात मोठा खुलासा ; भोरच्या डॉक्टरसह दोन जणांवर गुन्हा, आरोपी फरार

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
दौंड तालुक्यातील केडगाव परिसरात उघडकीस आलेल्या बेकायदेशीर गर्भलिंगनिदान प्रकरणाच्या तपासात यवत पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले असून, या प्रकरणात भोर तालुक्यातील किकवी येथील डॉ. मंदार माळी आणि उरुळी कांचन येथील सुंदरम कदम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
या प्रकरणातील आरोपींची संख्या आता पाचवर पोहोचली असून, ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या काही डॉक्टरांच्या सहभागाचे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. डॉ. मंदार माळी (रा. किकवी, ता. भोर) आणि सुंदरम कदम (रा. उरुळी कांचन, ता. हवेली) हे दोघेही सध्या फरार असून, यवत पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी अण्णासाहेब गिरी आणि त्याचा साथीदार डॉक्टर अतुल जाधव यांना न्यायालयाने पुन्हा दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस कोठडीत सुरू असलेल्या चौकशीतूनच फरार आरोपींची नावे समोर आली असल्याची माहिती तपास यंत्रणेकडून देण्यात आली. तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. गर्भलिंगनिदानासाठी वापरण्यात येणारे बेकायदेशीर सोनोग्राफी मशीन आरोपी अण्णासाहेब गिरी याला नरेंद्र ठाकरे याने पुरविल्याचे समोर आले आहे. नरेंद्र ठाकरे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक मारोती मेतलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, या रॅकेटमधील आणखी धागेदोरे आणि संबंधित व्यक्तींची नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे या काळ्या धंद्याचे जाळे अधिक व्यापक असल्याचे संकेत मिळत आहेत.
To Top