सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सातारा : प्रतिनिधी
सातारा शहरातील विसावा नाका परिसरातील एका कॅफेमध्ये स्वतंत्र पार्टिशनयुक्त खोल्या तयार करून पैसे घेऊन युवक-युवतींना एकांतासाठी सुविधा उपलब्ध करून देत अश्लील कृत्यांना चालना दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी छापा टाकून कारवाई करत सहाजणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ मे रोजी दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास विसावा नाका येथील लक्ष्मी प्लाझामधील ‘द लिटिल हार्ट कॅफे’ येथे छापा टाकण्यात आला. तपासादरम्यान कॅफेमध्ये प्लायवूड व लाकडी सनमायका वापरून स्वतंत्र पार्टिशनयुक्त खोल्या तयार करण्यात आल्याचे आढळून आले.
या खोल्या प्रति तास १०० रुपये भाड्याने देऊन ग्राहकांना एकांतात बसण्यासाठी सुविधा पुरविण्यात येत असल्याची माहिती समोर आली. छाप्यादरम्यान काही युवक-युवती आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. याप्रकरणी महिला पोलीस कॉन्स्टेबल क्रांती जाधव यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कॅफे चालक शिवराज विश्वास नावडकर (वय २५), अनिकेत विकास साबळे (वय २३), सानिया बबलू मुजावर (वय २२), नाज सलीम शेख (वय २१), मेहबूब रफिक शेख (वय २३) आणि शाहरुख सिराज शेख (वय २१) यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ४९, ३(५) आणि २९६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार मोरे करीत आहेत. या कारवाईमुळे सातारा शहरात खळबळ उडाली असून अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
