Pune Crime | पुणे स्टेशनवरून अपहरण झालेल्या एक वर्षांच्या बालिकेची १६ तासांत सुटका; महिलेसह तिघे दौंड येथे जेरबंद

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
पुणे : प्रतिनिधी 
पुणे रेल्वे स्थानक परिसरातून अपहरण करण्यात आलेल्या एका वर्षांच्या चिमुकलीची अवघ्या १६ तासांत सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी एका महिलेसह तिघांना दौंड रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेण्यात आले असून, प्राथमिक तपासात आरोपी बालिकेची विक्री करण्याच्या तयारीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बालिका आणि तिचे आई-वडील ३० मे रोजी पुणे रेल्वे स्थानक परिसरातील श्री दत्त मंदिरासमोरील मोकळ्या जागेत झोपले होते. मध्यरात्री बालिकेची आई झोपेत असताना आरोपींनी तिच्या शेजारी झोपलेल्या बालिकेचे अपहरण केले. जाग आल्यानंतर बालिका दिसून न आल्याने आईने तातडीने बंडगार्डन पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
तक्रार मिळताच बंडगार्डन पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलिसांनी स्टेशन परिसरातील तब्बल ६५ ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. या तपासात एक महिला आणि तिचे दोन साथीदार बालिकेला घेऊन फलाट क्रमांक चारवरून पनवेल-नांदेड रेल्वेत चढल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी नांदेडकडे जाणाऱ्या रेल्वे मार्गावरील विविध स्थानकांवर शोधमोहीम सुरू केली. लोहमार्ग पोलिसांनाही सतर्क करण्यात आले. तपासासाठी पोलिसांची विशेष पथके कुर्डुवाडी, बार्शी, सोलापूर, लातूर आणि दौंड परिसरात रवाना करण्यात आली.
दरम्यान, आरोपी दौंड रेल्वे स्थानक परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी सापळा रचून एका महिलेसह तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून बालिकेची सुखरूप सुटका करण्यात आली.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेशकुमार, उपायुक्त गौहर हसन आणि राजलक्ष्मी शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम राजमाने, पोलीस निरीक्षक संदीपान पवार, संतोष पांढरे, भगवान ईप्पर, सहायक निरीक्षक अभिजित चौगुले, उपनिरीक्षक वैभव मगदूम आणि त्यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी बजावली.

या घटनेमुळे रेल्वे स्थानक परिसरातील बालसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, आरोपींकडून बालिकेच्या अपहरणामागील नेमका हेतू आणि संभाव्य बालतस्करीच्या रॅकेटचा तपास पोलीस करत आहेत.
Tags
To Top