सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
प्रतिनिधी : संतोष माने
आज १ जून. अनेक सर्वसामान्य नागरिक, निवृत्त कर्मचारी, शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, मंत्री आणि आमदारांचा वाढदिवस आजच्या दिवशी असल्याचे पाहायला मिळते. यामागे कोणताही योगायोग नसून ग्रामीण भागातील जुन्या शैक्षणिक परंपरेचा हा एक भाग असल्याची आठवण आजही अनेक जण सांगतात.
पूर्वी ग्रामीण भागात बहुतांश पालक अशिक्षित असल्याने आपल्या मुला-मुलींची अचूक जन्मतारीख त्यांना माहीत नसायची. मुलाचे वय शाळेत दाखल करण्याइतके झाल्यानंतर त्याला इयत्ता पहिलीत प्रवेश दिला जात असे. त्यावेळी जन्मतारीख नोंदविताना अनेकदा ‘१ जून’ ही तारीख निश्चित केली जात असे. त्यामुळे त्या काळात शाळेत दाखल झालेल्या हजारो विद्यार्थ्यांच्या शालेय दाखल्यावर जन्मतारीख १ जून अशी नोंद झाली.
त्या काळी मुलगा किंवा मुलगी शाळेत प्रवेशासाठी पात्र आहे की नाही, हे पाहण्यासाठी उजवा हात डोक्यावरून नेऊन डाव्या कानाला टेकतो का, अशी पारंपरिक पद्धत वापरली जात होती. वयाचा अंदाज घेण्याचा तो एक निकष मानला जात असे. याच कारणामुळे आज अनेक ज्येष्ठ नागरिक, निवृत्त कर्मचारी, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच लोकप्रतिनिधी यांचा वाढदिवस १ जून रोजी साजरा होताना दिसतो. काहींची ही जन्मतारीख प्रत्यक्ष असते, तर अनेकांच्या बाबतीत ती शाळेच्या दाखल्यावरील अधिकृत जन्मतारीख असते.
निश्चित जन्मतारीख असो किंवा शालेय नोंदीनुसार ठरलेली तारीख असो, वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंदाचा आणि आठवणींचा दिवस असतो. जुन्या काळातील या प्रथेची आठवण करून देणारा १ जून हा दिवस आजही अनेकांसाठी विशेष ठरतो.
