Pune Breaking I इंद्रायणी नदीला पूर; आळंदीकडे जाणे टाळण्याचे प्रशासनाचे आवाहन

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
पुणे : प्रतिनिधी 
आषाढी वारी २०२६च्या पार्श्वभूमीवर इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून, आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेले आहेत. या परिस्थितीमुळे आळंदी शहरात येणे सध्या सुरक्षित नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
प्रशासनाने सर्व वारकरी, भाविक आणि नागरिकांना आळंदीकडे प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. ज्या वारकरी व भाविकांनी आळंदीच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे, त्यांनी ज्या ठिकाणी आहेत तेथेच सुरक्षित थांबावे आणि पुढील अधिकृत सूचना मिळेपर्यंत आळंदीमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांनी प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच अफवांवर विश्वास न ठेवता नदीपात्र, घाट परिसर आणि पाण्याखाली गेलेल्या पुलांच्या परिसरात जाणे टाळावे, असेही प्रशासनाने म्हटले आहे.
दरम्यान, नागरिक व वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असून, सर्वांनी संयम बाळगून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
To Top