Phaltan Breaking l ताथवडे घाटात दगड निसटून थेट चारचाकीवर कोसळला : बारामती तालुक्यातील आंबी येथील २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : हेमंत गडकरी
फलटण तालुक्यातील ताथवडे घाटात रविवार दि ५ जुलै रोजी घाटातील दगड कारवर पडून झालेल्या अपघातात बारामती तालुक्यातील आंबी खुर्द येथील कारचालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
    योगेश पोपट जगताप ( वय. २७ रा. आंबी खुर्द ता. बारामती )असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. योगेश याच्या मित्राची खटाव तालुक्यातील खातगुण येथे जत्रा होती. यासाठी योगेश आपल्या दुसऱ्या मित्राच्या चारचाकी ( एम एच ४२ बी ई २२४६ ) कारने जत्रेला निघाले होते.
 फलटण - पुसेगाव मार्गावर ताथवडे घाटातील पावसामुळे सैल झालेला दगड योगेश चालवत असलेल्या कारवर आदळला. दगड काच फोडून आत आला. या घटनेत योगेशच्या छातीला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याला तात्काळ डिस्कळ येथील रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. कारमधील इतर लोक किरकोळ जखमी झाले. फलटण येथील रुग्णालयात शवविच्छेदन करून आंबी खुर्द येथे योगेशवर अंत्यसंस्कार करण्यात आले. 
   योगेश सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या सोमेश्वर विद्यालय आंबी बुद्रुक या शाळेचा माजी  विद्यार्थी होता. त्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत अभियांत्रिकीची पदवी घेतली होती. तो रांजणगाव एमआयडीसी येथे एका चांगल्या कंपनीत कामाला होता. नुकताच त्याचा विवाह जिरेगाव ( ता. दौंड ) येथील मुलीशी निश्चीत करण्यात आला होता. दिवाळीत त्याचा विवाह होणार होता मात्र त्यापूर्वीच योगेशचा दुर्दैवी मृत्यू झाला.
To Top