सोमेश्वर रिपोर्टर टीम----
भिलार : सचिन भिलारे
भिलार तालुका महाबळेश्वर पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या भिलार परिसरात गेल्या तीन ते चार काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पडझडीच्या घटना घडत आहेत. अशातच भिलार-दानवली पारशी गार्डन च्या मुख्य रस्त्यावर काल मध्यरात्री महाकाय निलगिरीचे झाड मुळासकट उन्मळून थेट रस्त्यावर आडवे कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.
ही घटना रात्री घडल्यामुळे मोठी जीवितहानी टळली मात्र, दिवसा ही दुर्घटना घडली असती तर गंभीर अनर्थ ओढवला असता, अशी भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
झाड कोसळल्याने भिलार व दानवली दरम्यानचा संपर्क काही काळ पूर्णपणे खंडित झाला.
सकाळी घटना निदर्शनास येताच प्रशासनाची वाट न पाहता स्थानिक ग्रामस्थांनी पुढाकार घेत त्यांनी हे महाकाय झाड कापून रस्त्याच्या बाजूला हटवले. त्यानंतरच वाहतूक पूर्ववत सुरू झाली.
या घटनेमुळे भिलार-दानवली मार्गावरील धोकादायक निलगिरीच्या झाडांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. रस्त्यालगत अनेक वर्षांपासून उभी असलेली जुनी व पोकळ झालेली झाडे प्रवाशांसाठी मोठा धोका ठरत आहेत. या मार्गावरून दररोज शेकडो विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी व ग्रामस्थ प्रवास करतात. त्यामुळे नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
