मोठी बातमी I पुणे–मुंबई द्रुतगती महामार्ग आणि लोहमार्ग बंद; मुसळधार पावसामुळे वाहतूक विस्कळीत

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
पुणे : प्रतिनिधी 
गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे–मुंबई मार्गावरील जनजीवन विस्कळीत झाले आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबई आणि पुण्यासाठी अतिवृष्टीचा इशारा दिला असून, त्याचा परिणाम रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर झाला आहे.
पुणे–मुंबई द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंक परिसरात दरड कोसळल्याने, तर काही ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. जुना मुंबई–पुणे महामार्गही सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद करण्यात आला आहे. दोन्ही दिशेतील वाहतूक पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.
दरम्यान, पुणे–मुंबई लोहमार्गावरील ठाकूरवाडी परिसरातही दरड कोसळल्याने रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सीएसएमटीहून पुण्याकडे येणाऱ्या काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असून, प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
मुसळधार पावसामुळे लोणावळा घाट परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. लोणावळ्यापासून सुमारे ३५ किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र असून, अनेक वाहनचालक अडकून पडले आहेत. प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय पुणे–मुंबई प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. ज्यांनी प्रवासाचे नियोजन केले आहे, त्यांनी तो पुढे ढकलावा तसेच शासन आणि संबंधित यंत्रणांकडून जारी करण्यात येणाऱ्या वाहतूक सूचनांकडे लक्ष ठेवावे, असेही सांगण्यात आले आहे.

दरम्यान, भारतीय हवामान विभागाने पुणे शहरासह परिसरात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
To Top