बारामती l 'शक्ती बॉक्स’मधील तक्रारींची दखल : बारामती पोलिसांची शाळेत थेट ‘एंट्री’

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
बारामती : प्रतिनिधी
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत बारामती शहर पोलिसांकडून शाळांमध्ये प्रत्यक्ष भेटी, विद्यार्थ्यांशी संवाद आणि तक्रार निवारणाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. Community Policing अंतर्गत पोलिसांनी श्रीरामनगर, जळोची येथील कवी मोरोपंत शिक्षण संस्थेच्या प्राथमिक, माध्यमिक व इंग्लिश मीडियम स्कूलला भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या आदेशान्वये आणि बारामती शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ही भेट घेण्यात आली.
यावेळी शाळेतील ‘शक्ती बॉक्स’ अर्थात विद्यार्थी तक्रार पेटी उघडून त्यातील तक्रारींची पाहणी करण्यात आली. काही किरकोळ स्वरूपाच्या तक्रारींची संवेदनशीलतेने दखल घेत संबंधित विद्यार्थ्यांची ओळख व गोपनीयता कायम ठेवण्यात आली. मुख्याध्यापकांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांशी संवाद साधून गैरवर्तन करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षा करण्याऐवजी त्यांच्या वर्तनाचे परिणाम समजावून सांगत योग्य मार्गदर्शन करण्यात आले.
विद्यार्थ्यांना Good Touch–Bad Touch, छेडछाड, लैंगिक शोषण, रॅगिंग, सायबर गुन्हे, सायबर बुलिंग, सोशल मीडिया व मोबाईलचा सुरक्षित वापर याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कोणतेही संशयास्पद किंवा अस्वस्थ करणारे वर्तन झाल्यास ते लपवून न ठेवता पालक, शिक्षक अथवा पोलिसांना तातडीने सांगण्याचे आवाहन करण्यात आले.
तसेच अनोळखी व्यक्तींशी संवाद साधताना घ्यावयाची काळजी, ऑनलाइन फसवणूक टाळण्याचे उपाय, व्यसनाधीन पदार्थांपासून दूर राहणे, चुकीच्या संगतीपासून स्वतःचे संरक्षण आणि वाहतूक नियमांचे पालन याबाबतही विद्यार्थ्यांना सूचना देण्यात आल्या.

‘Police Kaka–Police Didi’ या संकल्पनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनातील पोलिसांची भीती कमी करून ‘पोलीस आपल्यासाठी आहेत’ हा विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या समस्या सुरुवातीच्या टप्प्यावरच समजून घेऊन योग्य मदत उपलब्ध करून देणे आणि गंभीर घटना घडण्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
या उपक्रमात म.पो.हवा. काळे, पो.शि. निंबाळकर, म.पो.कॉ. पंडित, पो.कॉ. विरकर व म.पो.कॉ. कदम यांनी सहभाग घेत विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला.
बारामती उपविभागात विद्यार्थी व महिला सुरक्षेसंदर्भातील प्रतिबंधात्मक पोलिसिंग अधिक प्रभावी करण्यासाठी अशा शाळा भेटी सातत्याने घेण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
To Top