सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
निंबुत गावच्या हद्दीत हातभट्टीची गावठी दारू विक्री करणाऱ्या महिला आरोपीविरुद्ध वडगाव निंबाळकर पोलिसांनी अजामीनपात्र गुन्हा दाखल करून तिला अटक केली असून, न्यायालयीन प्रक्रियेनंतर तिची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. या कारवाईमुळे परिसरातील अवैध हातभट्टी दारू विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील निंबुत, ता. बारामती, जि. पुणे येथे १ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७.१५ वाजता पोलिसांनी ही कारवाई केली. गावच्या हद्दीत ओढ्याजवळ एका पत्र्याच्या आडोशाला हातभट्टीची गावठी दारू विक्री व बाळगली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पथकाने कारवाई केली.
या कारवाईदरम्यान कोमल प्रमोद नवले (रा. निंबुत, ता. बारामती, जि. पुणे) ही महिला गावठी हातभट्टीची दारू विक्री करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांची चाहूल लागताच तिने घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी तिचा शोध सुरू करून तिला ताब्यात घेत अटक केली.
२५ लिटर गावठी दारूसह रोख रक्कम जप्त
पोलिसांनी आरोपीकडून २५ लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू, अंदाजे किंमत ₹२,५००, तसेच ₹२,१२० रोख रक्कम, असा एकूण ₹४,७२० किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक १७०/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३ तसेच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
BNS कलम १२३ अन्वये गंभीर कारवाई
सदर गुन्ह्यात BNS कलम १२३ लावण्यात आले असून, या कलमान्वये १० वर्षांपर्यंत कारावास व दंडाची तरतूद असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. यासोबतच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमातील संबंधित कलमान्वयेही कारवाई करण्यात आली आहे.
अवैध हातभट्टी दारू निर्मिती व विक्रीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून परिसरात कारवाई सुरू असून, या प्रकरणातील महिला आरोपीला अटक केल्यानंतर तिची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास प्रभारी अधिकारी एपीआय जीवन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रेड पोलीस उपनिरीक्षक वारुळे करीत आहेत.
