सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
शेतातून जाणाऱ्या महावितरणच्या विद्युत वाहक तारांना मोठ्या प्रमाणात झोळ पडल्याने तारांचा उभ्या पिकांशी घर्षण होऊन ठिणग्या पडत आहेत. या ठिणग्यांमुळे शेतातील उभा ऊस जळून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर महावितरणच्या सोमेश्वरनगर उपविभागातील सर्व गावांचा सर्वे करून धोकादायक पद्धतीने झोळ पडलेल्या वीजतारा तातडीने दुरुस्त कराव्यात, तसेच ऊस जळून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची गेल्या दोन-तीन वर्षांपासून प्रलंबित असलेली नुकसानभरपाईची प्रकरणे तातडीने निकाली काढावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
याबाबत सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक ऋषीकेश गायकवाड यांनी महावितरणच्या सोमेश्वरनगर उपविभागाच्या उपकार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले आहे. शेतकऱ्यांच्या शेतातून जाणाऱ्या महावितरणच्या विद्युत वाहक तारांना अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात झोळ पडलेला आहे. अनेक ठिकाणी या तारा शेतातील उभ्या पिकांच्या अगदी जवळून जात असल्याने वाऱ्यामुळे किंवा इतर कारणांमुळे तारांचा पिकांशी घर्षण होतो. त्यातून ठिणग्या पडून उभ्या उसाला आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. परिणामी संबंधित शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
वीजतारांच्या झोळामुळे जीवितालाही धोका
केवळ पिकांचे नुकसान एवढ्यापुरताच हा प्रश्न मर्यादित नसून झोळ पडलेल्या विद्युत तारांमुळे शेतकरी, शेतमजूर आणि पाळीव जनावरांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे. शेतातून जाणाऱ्या तारा खाली आल्याने शेतीची कामे करताना अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी महावितरणचे ट्रान्सफॉर्मर उभ्या पिकांमध्येच असल्याने त्यामध्ये स्पार्किंग होऊन पिके जळण्याच्या घटना घडल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे अशा धोकादायक ठिकाणांची तातडीने पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सर्व गावांचा सर्वे करण्याची मागणी
सोमेश्वरनगर उपविभागाच्या कार्यक्षेत्रातील केवळ तक्रार प्राप्त झालेल्या ठिकाणांचीच नव्हे, तर सर्व गावांमधील विद्युत वाहक तारांचा सर्वंकष सर्वे करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. सर्वेक्षणादरम्यान झोळ पडलेल्या तारा, पिकांना धोकादायक ठरणाऱ्या वीजवाहिन्या तसेच शेतातील ट्रान्सफॉर्मरची पाहणी करून तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी आहे. वेळीच ही कार्यवाही झाल्यास भविष्यात ऊस व इतर पिके जळण्याच्या घटना तसेच संभाव्य जीवितहानी टाळता येऊ शकते.
दोन-तीन वर्षांपासून नुकसानभरपाईची प्रतीक्षा
वीजवाहक तारांमुळे ऊस जळून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईसाठी महावितरणकडे प्रकरणे दाखल केली आहेत. मात्र, गेल्या दोन ते तीन वर्षांपासून काही नुकसानभरपाईची प्रकरणे प्रलंबित असल्याने पीडित शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. या प्रकरणांचा तातडीने पाठपुरावा करून नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी यापूर्वीही शेतकऱ्यांच्या वतीने निवेदने देण्यात आली आहेत.
कार्यवाही न झाल्यास धडक मोर्चा
महावितरण प्रशासनाने या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ झोळ पडलेल्या वीजतारांचा सर्वे करावा, धोकादायक तारा दुरुस्त कराव्यात आणि ऊस जळालेल्या शेतकऱ्यांची प्रलंबित नुकसानभरपाईची प्रकरणे निकाली काढावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागण्यांवर लवकरात लवकर कार्यवाही न झाल्यास पीडित शेतकऱ्यांशी चर्चा करून महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा ऋषीकेश गायकवाड यांनी दिला आहे.
ऊस जळालेल्या पीडित शेतकऱ्यांची नावे
ऊस जळून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांमध्ये संजय जगताप, नानासो माळशिकारे, दिलीप गाडेकर, अमर काळखैरे, सचिन साळवे, गौतम साळवे, महेंद्र साळवे, सौरभ
भोसले, सतीश लकडे, तेजस माने, शिवाजी शिंदे आणि मोहन ढोले यांचा समावेश आहे.
आता महावितरण प्रशासन या पीडित शेतकऱ्यांच्या प्रश्नावर किती गांभीर्याने कार्यवाही करते आणि प्रलंबित नुकसानभरपाई कधी मिळते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
