बारामती l सोमेश्वरनगरच्या शाळा-महाविद्यालय परिसरात तंबाखू विक्रीविरोधात वडगाव निंबाळकर पोलिसांची धडक कारवाई; चार विक्रेत्यांवर कारवाई

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
वडगाव निंबाळकर : प्रतिनिधी
शाळा व महाविद्यालय परिसर तंबाखूमुक्त ठेवण्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये तंबाखू सेवनाबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने वडगाव निंबाळकर पोलिसांनी गुरुवारी (दि. ३) विशेष तपासणी मोहीम राबविली. दुपारी ४ ते सायंकाळी ६ या वेळेत राबविण्यात आलेल्या या मोहिमेत शैक्षणिक संस्थांच्या परिसरातील टपऱ्या, पानटपऱ्या, किराणा दुकाने तसेच अन्य विक्री केंद्रांची तपासणी करण्यात आली.
या तपासणीदरम्यान शाळा व महाविद्यालयांच्या १०० यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या चार विक्रेत्यांविरुद्ध सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थ अधिनियम, २००३ (COTPA Act) अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात आली. संबंधित विक्रेत्यांकडून तंबाखूजन्य पदार्थ जप्त करून नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली. शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केल्याने विद्यार्थ्यांना त्याची सहज उपलब्धता होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा प्रकारच्या विक्रीवर कायद्याने निर्बंध घालण्यात आले आहेत. 

तसेच अल्पवयीन मुलांना तंबाखूजन्य पदार्थ विकणे किंवा उपलब्ध करून देणे हा दंडनीय गुन्हा असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. वडगाव निंबाळकर पोलिसांनी नागरिक, पालक, शाळा व्यवस्थापन तसेच दुकानदारांना शैक्षणिक संस्थांच्या १०० यार्ड परिसरात कोणत्याही प्रकारचे तंबाखूजन्य पदार्थ विक्री करू नयेत, असे आवाहन केले आहे.
To Top