सोमेश्वर रिपोर्टर टीम----
बारामती : प्रतिनिधी
बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीतील भिगवण रोड परिसरातील एका निवासी इमारतीत राहणाऱ्या १६ वर्षीय विद्यार्थिनीने दि. ०४ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील टेरेसवरून उडी मारल्याची दुर्दैवी घटना घडली. गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थिनीला तातडीने वैद्यकीय महाविद्यालय, बारामती येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान पहाटे सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास तिचा मृत्यू झाला.
सदर विद्यार्थिनी बारामती येथील एका महाविद्यालयात इयत्ता अकरावी सायन्समध्ये शिक्षण घेत होती. सध्या तिच्या परीक्षा सुरू होत्या. पालकांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून ती अभ्यास आणि परीक्षेचा ताण घेत होती. अभ्यास होत नसल्याबाबत तसेच परीक्षेचे टेन्शन येत असल्याचे ती आई-वडिलांना सांगत होती. दि. ०४ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे १२.३० वाजेपर्यंत ती अभ्यास करत होती. त्यानंतर टेरेसवर जाऊन येत असल्याचे सांगून ती इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील गच्चीवर गेली. बराच वेळ होऊनही ती खाली न आल्याने तिचे वडील तिला पाहण्यासाठी वर गेले. त्यावेळी ती टेरेसच्या कड्यावर बसलेली दिसली. वडिलांनी आवाज दिल्यानंतर तिने अचानक खाली उडी मारल्याची माहिती प्राथमिक चौकशीतून समोर आली आहे.
गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थिनीला आई-वडील आणि शेजाऱ्यांच्या मदतीने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना काही काळ ती शुद्धीवर होती. त्यावेळी तिने आईकडे पिण्यासाठी पाणी मागितल्याची माहिती पालकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर तिची प्रकृती गंभीर झाली आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
या घटनेप्रकरणी विद्यार्थिनीच्या आई-वडिलांनी किंवा नातेवाईकांनी सद्यस्थितीत कोणत्याही व्यक्तीविरुद्ध तक्रार अथवा संशय व्यक्त केलेला नाही. अभ्यास व परीक्षेचा ताण हे पालकांनी सांगितलेले प्राथमिक कारण असले, तरी आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप निश्चित झालेले नाही.
यापूर्वीही सदर विद्यार्थिनी घरातून निघून गेल्याची नोंद बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली होती. त्या पूर्वीच्या प्रकरणातील कागदपत्रे, जबाब आणि तपासादरम्यान निष्पन्न झालेल्या बाबींची सद्य घटनेच्या अनुषंगाने पडताळणी करण्यात येत आहे.
प्राथमिक चौकशीत विद्यार्थिनीकडे स्वतःचा वैयक्तिक मोबाईल फोन नसल्याची माहिती समोर आली आहे. ती आवश्यकतेनुसार आई-वडिलांच्या मोबाईलचा वापर करत होती. संबंधित मोबाईलमधील घटनेशी संबंधित उपलब्ध डिजिटल माहितीची कायदेशीर प्रक्रियेनुसार पडताळणी करण्यात येत आहे. घटनास्थळाची पाहणी, पंचनामा, उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज, वैद्यकीय कागदपत्रे, डिजिटल माहिती तसेच पालक, नातेवाईक, मैत्रिणी, सहाध्यायी, शिक्षक आणि आवश्यक संबंधित व्यक्तींचे जबाब घेऊन बारामती शहर पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे.
अभ्यासाचा ताण हे प्राथमिक कारण असल्याचे पालकांकडून सांगण्यात आले आहे. मात्र त्याव्यतिरिक्त वैयक्तिक, शैक्षणिक, कौटुंबिक किंवा अन्य कोणती पार्श्वभूमी होती का, तसेच कोणाकडून त्रास, दबाव किंवा आत्महत्येस प्रवृत्त करण्यासारखी बाब घडली होती का, याचीही निष्पक्षपणे पडताळणी केली जात आहे. या प्रकरणी कायदेशीर प्रक्रियेनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास बारामती शहर पोलीस स्टेशनकडून सुरू आहे.
अल्पवयीन मृत विद्यार्थिनीची ओळख गोपनीय ठेवण्यात आली आहे.
नागरिक आणि प्रसारमाध्यमांनी तिचे नाव, छायाचित्र किंवा ओळख पटेल अशी कोणतीही वैयक्तिक माहिती प्रसिद्ध करू नये, असे आवाहन बारामती शहर पोलिसांकडून करण्यात आले आहे.
