सोमेश्वर रिपोटर टीम——
मोहोळ : प्रतिनिधी
दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे प्रवासासाठी बाहेर पडलेल्या एका कुटुंबावर काळाने घाला घातला. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर तेलंगवाडी हद्दीतील डोंगरे वस्ती परिसरात शुक्रवारी (दि. ६ नोव्हेंबर) दुपारी साडेदोनच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. इर्टिगा कारने महामार्गाच्या बाजूला उभ्या असलेल्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, MH 04 KL 5222 क्रमांकाची इर्टिगा कार पुणे-सोलापूर महामार्गावरून प्रवास करत होती. यावेळी मुरूमाच्या साईडपट्टीवर उभ्या असलेल्या NL 01 AL 1379 क्रमांकाच्या कंटेनरला कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, कारमधील विलास भारंबे (वय ६६), शोभा विलास भारंबे (वय ६३) आणि पार्थ तुषार भारंबे (वय ८) या तिघांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात तुषार विलास भारंबे (वय ४०) आणि पूनम तुषार भारंबे (वय ३८) हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने सोलापूर येथील शासकीय सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मृतांचे पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि मोहोळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक दीपक पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून वाहतूक सुरळीत केली.
दरम्यान, दिवाळी सण आणि सलग सुट्ट्यांमुळे पुणे-सोलापूर महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ वाढली आहे. अशा परिस्थितीत महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांमुळेही अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. वाहनचालकांनी वेगमर्यादेचे पालन करावे, वाहनांमध्ये सुरक्षित अंतर ठेवावे आणि प्रवासादरम्यान विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.




