सोमेश्वर रिपोटर टीम—-
इचलकरंजी : प्रतिनिधी
मुलीचा आंतरजातीय प्रेमविवाह जुळवून दिल्याचा राग मनात धरून इचलकरंजीतील प्रसिद्ध पुरोहित व ज्योतिषी मंदार अजित रानडे (वय ३५) यांची निर्घृण हत्या करण्यात आली. लग्नाचे बनावट आमिष दाखवून त्यांना मानकापूरच्या शिवारात बोलावण्यात आले. डोळ्यांत मिरचीपूड फेकून कोयत्याने सपासप वार करत त्यांचा जीव घेण्यात आला. या खळबळजनक हत्येचा कर्नाटकातील सदलगा पोलिसांनी छडा लावत संशयित आरोपी बाबूसाहेब उर्फ दीपक मगदूम (वय ४५, रा. शिरदवाड) याला ताब्यात घेतले आहे.
उसाच्या शेतात आढळला रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील मानकापूर गावच्या हद्दीत ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास तेरदाळे यांच्या उसाच्या शेतात काम करणाऱ्या महिलांना मंदार रानडे यांचा छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह आढळला. गळ्यावर आणि मानेवर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणा होत्या. या घटनेने इचलकरंजी शहरासह सीमाभागात मोठी खळबळ उडाली.
मुलीच्या प्रेमविवाहाचा राग मनात
आरोपी दीपक मगदूम याची १९ वर्षीय मुलगी अनुजा हिने १३ जानेवारी २०२६ रोजी घरातून निघून शिवनाकवाडी येथील ओंकार आनंद कोंचे याच्यासोबत आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. हा विवाह जुळवून आणण्यात आणि त्याचे पौरोहित्य करण्यात मंदार रानडे यांनी मदत केली होती. याच कारणावरून आरोपीच्या मनात राग होता. विवाहामुळे समाजात आपली बदनामी झाल्याच्या भावनेतून त्याने रानडे यांच्या हत्येचा कट आखल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
बनावट लग्नाचे आमिष दाखवून बोलावले
आरोपीने वेगळ्या मोबाईल क्रमांकावरून मंदार रानडे यांच्याशी संपर्क साधला. आणखी एक लग्न जुळवायचे असल्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला आणि मानकापूर परिसरात बोलावून घेतले. रानडे घटनास्थळी पोहोचताच आरोपीने त्यांच्या डोळ्यांत लाल मिरचीपूड फेकली. त्यामुळे त्यांना प्रतिकार करता आला नाही. यानंतर कोयत्याने गळ्यावर आणि मानेवर वार करून त्यांची हत्या केली.
तांत्रिक तपासातून आरोपीचा शोध
घटनेचे गांभीर्य ओळखून बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक रामराजन आणि पोलीस उपअधीक्षक गोपाळकृष्ण गौडार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले. चिक्कोडी विभागाचे मंडळ पोलीस निरीक्षक विश्वनाथ चौगुले, सदलगा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक बसगौडा नेर्ली व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोबाईल लोकेशन, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास केला. त्यातून शिरदवाड येथील दीपक मगदूम याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. हत्येसाठी वापरलेला रक्ताने माखलेला कोयताही जप्त करण्यात आला आहे.
केदार कुलकर्णी यांच्या तक्रारीवरून सदलगा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हत्येमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा पोलीस तपास करीत आहेत. मुलीचा आंतरजातीय विवाह जुळवून दिल्याच्या रागातून एका पुरोहिताची हत्या झाल्याने इचलकरंजीसह महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात संताप व्यक्त होत आहे.





