सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सुपा : प्रतिनिधी
दिवाळी म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा आणि आपुलकीचा सण! मात्र, आपल्या आनंदापूर्वी समाजातील वंचित आणि विशेष गरजा असलेल्या मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचा विचार करणारी माणसे खऱ्या अर्थाने समाजाचे वैभव असतात. याच सामाजिक बांधिलकीतून 'आधी दिवाळी मतिमंद मुलांसाठी... नंतर आपली!' हा संवेदनशील विचार जपत रामदास राऊत आणि मित्रपरिवाराने एक अनोखा आदर्श निर्माण केला आहे.
मौजे सुपा (ता. बारामती) येथील प्राजक्ता मतिमंद विद्यालयात गेल्या दहा वर्षांपासून रामदास राऊत आणि त्यांचा मित्रपरिवार तसेच विविध सहकारी संस्थांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात येत आहे. दरवर्षी सातत्याने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे विद्यालयातील विद्यार्थ्यांची दिवाळी अधिक आनंददायी होत आहे.
दिवाळीच्या सणात समाजातील विशेष मुलांनाही आनंदाचे क्षण अनुभवता यावेत, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे आणि त्यांनाही आपलेपणाची जाणीव व्हावी, या उदात्त भावनेतून हा उपक्रम राबविला जातो. केवळ फराळाचे वाटप नव्हे, तर या मुलांप्रती असलेली माया, जिव्हाळा आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव या उपक्रमातून व्यक्त होत आहे.
विद्यालयाचे व्यवस्थापक गणेश भुजबळ आणि मुख्याध्यापिका शुभांगी सुपेकर तसेच शिक्षक वर्ग यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, गेल्या दहा वर्षांपासून नियमितपणे सुरू असलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आणि प्रेरणादायी आहे. समाजातील दानशूर व्यक्ती, रामदास राऊत, त्यांचा मित्रपरिवार आणि सहकार्य करणाऱ्या विविध सहकारी संस्थांमुळे विद्यार्थ्यांच्या दिवाळीत आनंदाची भर पडत आहे. या सर्वांचे विद्यालयाच्या वतीने आणि विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले. दीपावली बरोबरच विद्यार्थ्यांच्या अडचणींसाठी शालेय साहित्य व संगणकीय साहित्य याच मदत विविध माध्यमातून आतापर्यंत करत आले आहेत.
स्वतःच्या घरात दिवाळी साजरी करण्यापूर्वी या विशेष मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा विचार म्हणजेच खऱ्या अर्थाने माणुसकीचा सण! रामदास राऊत आणि मित्रपरिवाराचा हा दहा वर्षांचा सेवाभावी प्रवास समाजातील इतरांसाठीही निश्चितच प्रेरणादायी आहे.


