डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता आणि मूकनायक-डॉ. के राहुल
कोणतीही चळवळ आणि विचारधारा बळकट करायची असेल; त्या चळवळीची आणि विचारधारेची भूमिका जनसामान्यांसमोर मांडायची असेल तर प्रसारमाध्यमांशिवाय पर्याय नाही. बदलत्या काळात प्रसारमाध्यमांची भूमिका, स्वरूप, प्रकार आणि गरज यात लक्षणीय बदल झाला असला तरी स्वातंत्र्यपूर्व कालखंडात प्रसारमाध्यमे म्हणून वृत्तपत्रे, साप्ताहिके, पाक्षिके किंवा मासिकेच नजरेसमोर येतात. यातील सगळीच वृत्तपत्र किंवा मासिके ही एकाच विचारधारेची नव्हती हेही तितकेच खरे. म्हणजे स्वातंत्र्याचा इतिहास पहिला तर एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते ती म्हणजे अनेक वृत्तपत्रे आणि मासिके यांनी ब्रिटिश सत्तेचे लांगुलचालन करतानाच समाजसुधारणा, समता आणि दलित चळवळीविरोधी भूमिका घेतली होती. यातून त्यांना प्रतिष्ठाही लाभली होती. म्हणजेच त्याकाळी नामांकित असलेली आणि प्रसिद्ध पावलेली जवळजवळ सर्वच वृत्तपत्रे आणि मासिके ही तत्कालीन सरकारधार्जिणी होती म्हणजे सत्तेवर असलेल्या लोकांशी जुळवून घेण्यात आणि त्यातून होणारे आर्थिक लाभ कसे पदरात पाडून घेता येतील यासाठी ही वृत्तपत्रे काम करत होती. म्हणजेच देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचे एक अंग म्हणून सामाजिक सुधारणांच्या आणि दलित चळवळीच्या बाजूने बहुसंख्य प्रस्थापित प्रसारमाध्यमे उभी राहिलेली नाहीत, हेही सहज लक्षात येते.
अश्यावेळेस आंदोलने, चळवळी आणि जनसामान्यांचे प्रश्न लोकांसमोर मांडण्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला त्यामध्ये नव्याने उभ्या राहत असलेल्या अनेक स्वातंत्र्यप्रेमी आणि समतावादी विचारवंतांनी आणि सुधारकांनी आपापल्या भूमिका आणि चळवळींची बाजू मांडण्यासाठी आपली स्वतःची मुखपत्रे सुरू केली होती. या सुधारक आणि विचारवंतांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल इतके काम अल्पावधीतच बाबासाहेबांनी आपल्या लेखनातून केले आहे. बाबासाहेब फक्त लिहून थांबलेले नाहीत तर ते लिखाण सामान्य जनतेपर्यत पोहचविण्यासाठी तीन वृत्तपत्रांबरोबरच त्यांनी एक साप्ताहिक आणि एक पाक्षिक सुरू केले होते त्यांची नावे अनुक्रमे "मूकनायक" आणि "बहिष्कृत भारत" होत.
पार्श्वभूमी:
व्यवस्थेने नाकारलेल्या आणि अत्यंत हीन वागणूक दिलेल्या समाजाचे प्रश्न समाजासमोर आणि ब्रिटिश सरकारपुढे मांडण्यासाठी, त्यांच्या वेदना आणि विद्रोहाला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी १९ जानेवारी १९२० रोजी बाबासाहेबांनी "मूकनायक" हे साप्ताहिक सुरू केले. आपला समाज आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असून त्याला आपल्या प्रश्नांची जाणीव झालेली नाही. ही जाणीव करून द्यायची असेल तर त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे आणि त्यांना समजेल अश्या भाषेत लिहिणे आवश्यक आहे हे लक्षात घेऊन बाबासाहेबांनी महाराष्ट्र हे कार्यक्षेत्र असल्याने 'मूकनायक' हे मराठी भाषेतील साप्ताहिक सुरू केले. ३१ जानेवारी १९२० ला मूकनायकचा पहिला अंक प्रकाशित करण्यात आला. बाबासाहेबांची समाजसुधारणेची तळमळ लक्षात घेऊन थोर समाजसुधारक आणि रयतेचे राजे छत्रपती शाहू महाराज यांनी त्याकाळी बाबासाहेबांना रु. २५००/- ची आर्थिक मदत दिली होती. त्याकाळी बाबासाहेब मुंबईच्या सिडनेहँम महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरी करत होते आणि तांत्रिकदृष्ट्या त्यांना "मूकनायक"चे थेट संपादन करणे शक्य नव्हते म्हणून त्यांनी मुकनायकच्या संपादकपदी पांडुरंग नंदराम भटकर या दलित तरुणाची तर व्यवस्थापकपदी ज्ञानदेव घोलप यांची नेमणूक केली. असे असले तरी मूकनायक चालू होते तोपर्यंत बाबासाहेब गरजेनुसार आणि वेळ मिळेल तसे मुकनायकमध्ये लिहीत राहिले. मुकनायकच्या पहिल्या अंकात 'मनोगत' या सदराखाली बाबासाहेबांनी स्वतः लेख लिहिला आणि पुढील सलग तेरा अंकात ते कोणत्या ना कोणत्या विषयावर मुकनायकमध्ये लिहीत राहिले. जुलै १९२० मध्ये उच्चशिक्षणासाठी लंडनला गेल्यानंतरही ते काही काळ लिहीत राहिले. मार्च १९२३ पर्यंत ज्ञानेश्वर घोलप यांच्या संपादन आणि व्यवस्थापनाखाली मूकनायकचे काम सुरू होते. एप्रिल १९२३ मध्ये आर्थिक कारणामुळे तसेच घोलप आणि बाबासाहेब यांच्यात झालेल्या मतभेदांमुळे 'मूकनायक' कामकाज थंडावले.
मुकनायकची भूमिका:
पारतंत्र्याच्या काळात मावळ आणि जहाल गटातील मतभेदांनंतर स्वतंत्रता आंदोलनाचे नेतृत्व मवाळ गटाकडे आणि पर्यायाने राष्ट्रीय काँग्रेसपक्षाकडे गेल्याने स्वतंत्रता चळवळीची आणि पुरोगामी विचारांची बाजू मांडणारी सर्व मुख्य वृत्तपत्रे काँग्रेसची बाजू मांडत होती. यात सनातनी हिंदुची बाजू मांडणारीही वृत्तपत्रे होती आणि त्यांचा काँग्रेसलाही विरोधच होता. असे असले तरी दलितहित विरोधी भूमिका घेण्यात आणि दलितांच्या प्रश्नांवर दुर्लक्ष करण्यात पुरोगामी विचारांची म्हणवून घेणारी वृत्तपत्रे आणि सनातनी वृत्तपत्रांचे एकमत होते. बाबासाहेबांची स्वातंत्र्याबाबतची भूमिका राष्ट्रीय नेत्यांची असली तर ब्रिटिशांच्या हातात बऱ्याच गोष्टी असल्याने बाबासाहेब ब्रिटिश सरकारने दलितांच्या प्रश्नांवर सकारात्मक भूमिका घ्यावी म्हणून प्रयत्नशील होते. त्याचाच भाग म्हणून बाबासाहेबांनी सनातनी हिंदू धर्माबाबत आणि त्यातील दलित हिताविरोधी रूढी, प्रथा आणि परंपराबाबत अत्यंत कठोर भूमिका घेतली होती. जहाल हिंदूंबरोबरच काँग्रेसला दलितांच्या हिताचे निर्णय घ्यावेसे वाटत नाहीत म्हणून बाबासाहेबांनी आपल्या लेखनातून, भाषणातून आणि वेळोवेळी ब्रिटिश सरकारला दिलेल्या निवेदनांतून टीकेची झोड उठविली होती. "मूकनायक" आणि "बहिष्कृत भारत"ने याबाबतीत महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. बाबासाहेबांनी "मुकनायक"मधून सवर्ण हिंदुंकडून दलितांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारांना वाचा फोडली आणि त्यातून ब्रिटिश सरकारनेही या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहावे यासाठी प्रयत्न केले त्यामुळे सवर्णकेंद्री प्रसारमाध्यमांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठविली. त्यांना रावण, राक्षस, धर्मविरोधी, राष्ट्रद्रोही, भीमासुर अशी विशेषणे वापरून त्यांची निर्भत्सना करण्यात आली. महात्मा गांधींच्या लढ्याला अहिंसात्मक आंदोलने ठरविणाऱ्या या प्रसारमाध्यमांनी बाबासाहेबांच्या शांततापूर्ण संघर्षाला कधीही अहिंसात्मक आंदोलने म्हटले नाही.
"मूकनायक"मधून भूमिका मांडताना बाबासाहेब म्हणतात, "भारतातील दलित आणि मागास घटकांना कोणीही वाली नाही. हिंदू समाजातील व्यवस्था ही धर्माधिष्टीत व्यवस्था असून जातींच्या उतरंडीचा मनोरा आहे. यातील खालच्या थरात देशातील दलित आणि मागास समाज व स्त्रिया असून ते सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्टया सवर्णांच्या सत्तापिपासू वर्चस्ववादी धोरणांमुळे आणि अन्याय-अत्याचारामुळे पिढ्यानपिढ्या दबलेले आहेत. शिवाय या मनोऱ्याला शिडीही नाही जेणेकरून खालचा माणूस आपल्या कर्तृत्वाने वरच्या मजल्यावर जाऊ शकेल. म्हणजेच हिंदू धर्मव्यवस्था ही मनुस्मृती या बिनबुडाच्या ग्रंथावर आधारित असल्याने तिने वर्णव्यवस्थेला कायदेशीर स्वरूप दिले आहे. त्यामुळे हिंदू धर्मात दलितांनी कितीही कर्तृत्व दाखविले आणि गुणवत्ता सिद्ध केली तरी त्यांचा विकास आणि उद्धार होणार नाही. त्यांनी तसा प्रयत्न केला तर त्यांचे वेगवेगळ्या प्रकारे खच्चीकरण केले जाईल. त्यांचे शारीरिक आणि मानासिक शोषण करण्याची कटकारस्थाने केली जातील. त्यामुळे हिंदू समाजातील ही वर्णव्यवस्था खालच्या वर्गातील लोकांना विकासाच्या संधी नाकारणारी व्यवस्था आहे.'
'हिंदू धर्मव्यवस्था ही फक्त ब्राह्मण आणि दलित यावर आधारित नसून ती ब्राह्मण, बिगरब्राह्मण आणि दलित अशी त्रिस्तरीय यंत्रणा आहे ज्यात ब्राह्मण स्वतःला उच्च स्थानी समजतात आणि बिगरब्राह्मणांना आपले सर्वोच्च स्थान टिकवून ठेवण्यासाठी आणि दलितांवर अत्याचार करण्यासाठी वापरून घेतात तर बिगरब्राह्मण समाज त्यात धन्यता मानून ब्राह्मण वर्चस्व भक्कम करण्यासाठी हातभारच लावतो.
'हिंदू समाजातील देवाची कल्पना अमानवी असून ती जनावरांमध्ये तसेच निर्जीव आणि निरुपयोगी वस्तूंमध्ये देवाचे अस्तित्व मानते आणि दलित-मागास समाजाला हिंदू धर्माचा भाग मानतानाच त्यांचे माणूसपण नाकारते.'
'ब्राह्मणी व्यवस्था ज्ञान आणि शिक्षण प्रसाराच्या विरोधात असून आपली सामाजिक, राजकीय आणि आर्थिक सत्ता आणि वर्चस्व कायम राखण्यासाठी दलित आणि मागास समाजाला अज्ञानात ठेवून त्यांच्यातील अंधश्रद्धा कायम ठेवण्यासाठी आजही वेगवेगळ्या मार्गाने सतत प्रयत्नशील आहे.'
'सामाजिक न्याय, समता आणि बंधुता ही स्वातंत्र्याची तीन मूलभूत तत्वे असून हिंदू धर्म ती दलित आणि मागास समाजाच्या विकासासाठी कधीच अवलंबू देणार नाही. दलित आणि मागास समाजाचा विकास व्हायचा असेल तर संपूर्ण भारतभर बुद्ध, बसवेश्वर आणि ज्योतिराव फुले यांच्या विचारांची क्रांती होणे गरजेचे आहे. 'भारताला चांगले राष्ट्र म्हणून पुढे येण्यासाठी फक्त स्वातंत्र्य मिळणे पुरेसे नसून भारताने जात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन समता, न्याय, बंधुता, सर्वांना समान राजकीय आणि आर्थिक संधी देणारी व्यवस्था निर्माण करायला हवी.'
'भारत आहे त्या परिस्थितीत स्वतंत्र झाला तर ब्रिटिश सत्तेने दलित आणि मागास समाजाला मिळालेले थोडे बहुत संरक्षण निघून जाईल आणि पुन्हा भारताची वाटचाल चातुर्वर्ण्य व्यवस्थेकडे सुरू होईल. 'चळवळीला जर मुखपत्र नसेल तर अशी चळवळ अपयशी ठरते. कारण वेगळा आणि प्रस्थापित व्यवस्थेला आव्हान देणा-या विचारांना त्या व्यवस्थेचे लांगुलचालन चलन करणारी प्रसारमाध्यमे दुर्लक्षित करतात किंवा त्याला नगण्य स्थान देतात त्यामुळे या चळवळी अपेक्षित परिणाम साधत नाही. तसेच वृत्तपत्र सुरू करण्यासाठी आर्थिक पाठबळाची गरज असून त्यासाठी जाहिराती मिळविणे आवश्यक आहे. बाबासाहेबांनी "मूकनायक" सुरू केल्यानंतर त्याची माहिती सामान्य जनतेला व्हावी यासाठी त्याची जाहिरात प्रसिध्द करण्यास टिळकांच्या हयातीत 'केसरी' वृत्तपत्राने नकार दिला. "मूकनायक" निरंतर चालू राहण्यात आर्थिक पाठबळ गरजेचे होते. त्यासाठी गोदरेज उद्योग समूहाने मोलाची मदत केली पण सनातनी हिंदूंच्या दबावामुळे पुढे ही मदत बंद झाली. ही मते आपल्या लेखातून मांडतानाच आपला उद्धार आपल्याशिवाय कोणीच करणार नाही, आपणच आपल्या अधिकारासाठी लढावे लागेल असे सतत आवाहन बाबासाहेब मूकनायक मधील आपल्या लेखनातून करत राहिले.
लेखक: डॉ. के. राहुल ९०९६२४२४५२