नीरा : प्रतिनिधी (सनी निगडे)
कोरोनामुक्त राहण्यासाठी प्रत्येकाने आपापली आचारसंहिता ठरवून शासनाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.कोरोना विषाणूशी दोन हात करण्यासाठी ग्राम पातळीवर स्थापन करण्यात आलेल्या समित्यांनी प्रयत्न केल्यास व या समित्यांना गावकऱ्यांनी सहकार्य केल्यास गावे कोरोनामुक्त राहतील.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावागावात ग्राम कोरोना, आपत्ती व्यवस्थापन, ग्राम रक्षक किंवा सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली आहे. गावागावात समित्या निर्णय घेत आहेत परंतु, अनेक ठिकाणी हे निर्णय केवळ कागदावर राहत आहेत तर अनेक ठिकाणी काही गावकऱ्यांचे सहकार्य मिळत नसल्याने म्हणाव्या तशा उपाययोजना होत नसल्याचे दिसून येत आहे. कोरोना विषाणू उंबरठ्यावर असताना गाफील राहून दैनंदिन व्यवहार करणे जीवावर बेतू शकते. गावात स्थापन करण्यात आलेल्या समित्यांकडून महत्वाचे निर्णय घेण्यात येत नसल्याने ग्रामीण भागात धोका दिवसेंदिवस वाढत आहे. जंतुनाशक फवारून कोरोना विषाणू नाहीसा होईल अशी आशा धरण्यात काहीही तथ्य नसल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्टपणे सांगण्यात येत आहे. असे असतानाही गावातील लोक शहरी भागात जाऊन येताना दिसत आहेत. पालेभाज्या, फळभाज्या, फळे खरेदीसाठी रांगा लागत आहेत. किराणा माल दररोज खरेदी करणारे महाभागही पाहायला मिळत आहेत तर दुसरीकडे सुरक्षिततेच्या कोणत्याही उपाययोजना न करता विक्री करणारे व्यावसायिक, विक्रेते कोरोनाला आमंत्रण देत आहेत. केवळ पासबुकची एन्ट्री मारण्यासाठी बॅंकेत रांगा लावून थांबणारे, एटीममधून पैसे काढण्यासाठी वारंवार जाणाऱ्या लोकांमुळे समितीतील सदस्यही पुरते हैराण झाले आहेत.
अनेक ठिकाणी आओ जावो, घर, गाव तुम्हारा ! अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. गावातील समित्या मतदान लक्षात घेता तीव्र कारवाई करताना दिसून येत नाहीत. उगाच वैर किंवा वाद नको या भावनेतून सुरक्षित शाररिक अंतर राखणे व घरात विलगिकरण करण्याच्या सुरक्षा उपायांना पुरती हरताळ फासली गेली आहे.
ग्राम पातळीवर आरोग्य सेवकांना सहकार्य करण्याबाबत ग्राम समितीने पाऊले उचळण्याबाबत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आदेश दिले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा गावांची मदार या समित्यांवर असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आपल्या भागात कोरोना नाही असे म्हणत निष्काळजी वावरणाऱ्या तरुणांनी वेळीच खबरदारी घेणे गरजेचे असून एकदिलाने ग्राम समित्यांना सहकार्य करणे गरजेचे आहे. अनेक ठिकाणी ग्रामसेवकांनी व सरपंचांनी या समित्यांत आपल्या मर्जीतील लोकांना घेतल्याने अशा समित्या निष्प्रभ ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
समित्यांनी हे निर्णय घेण्याची गरज -
१) परागावहून येणाऱ्या व्यक्तींना इतरांच्यात मिसळू न देता त्यांना शाळेत विलग ठेवावे.
२) केशकर्तनालये, ब्युटी पार्लर पूर्णपणे बंद ठेवावेत. केशकर्तन करणाऱ्या व्यक्तींना घरी बोलावून केस कापू नयेत.
३) गावात भाजीपाला उपलब्ध असल्यास बाहेरून भाजीपाला आणण्यावर निर्बंध घालावेत.
४) शेतमजुरांना कामासाठी नेताना एकाच गाडीत दाटीवाटीने नेले जात आहे. शारीरिक अंतर ठेवून प्रवास करावा तसेच गावातील मजूर यांनी गावाच्या बाहेर किमान काही दिवस प्रवास व काम करू नये.
५) गावाच्या बाहेर जाताना समितीकडे नोंद करून जाण्याचा नियम लागू करावा. विनाकारण बाहेर जाणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईला सुरुवात करावी.
६) बाहेरील वस्तू आवश्यकता नसल्यास अजिबात खरेदी करू नये.
७) गावात कुठेही वावरताना नाकाला मास्क लावावा व सॅनिटायझरचा वापर अवश्य करावा.
८) सार्वजनिक ठिकाणांवर जमा होण्याचे टाळावे.
९) मास्क न लावता विक्री करणाऱ्या किराणा दुकानदार व भाजीपाला विक्रेत्यांवर समिती मार्फत कारवाई करावी.
१०) एकमेकांचे मोबाईल हातात घेणे टाळावे.
११) घरी राहावे, सुरक्षित राहावे.