संचारबंदीत रेशनिंगसाठी देऊळवाले समाज गुळुंचे गावात दाखल
नीरा दि ९ एप्रिल
देशभरात लॉकडाऊन सुरू असून संचारबंदी व आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत गुळुंचे (ता.पुरंदर) येथील भटका असणारा देऊळवाल्या समाजातील बाहेरगावी असणारी कुटुंबे अचानक रात्री प्रवास करून पहाटेच्या सुमारास लॉक डाऊनमध्ये टेम्पोत गावात आले. विशेष म्हणजे या कुटुंबांच्याव्यतिरिक्त इतर सहा ते सात कुटुंबे नव्याने प्रवास करून आली. रेशन मिळत नसल्याने हा प्रवास करून लॉक डाऊनचे नियम धाब्यावर बसवत हा प्रवास केल्याची माहिती संबंधित कुटुंबाकडून मिळाली.
याबाबत स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे आठ ते दहा कुटुंबे गुळुंचे गावात पहाटे पहाटे टेम्पो, शेळ्या मेंढ्या यांसह दाखल झाली. गेल्या काही महिन्यांपासून चिंच तोडणीच्या कामासाठी हे मजूर परगावी होते. अचानक आलेल्या अनोळखी कुटुंबांमुळे येथील नागरिक धास्तावले. त्यांनी जेजुरी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अंकुश माने व पोलीस पाटील दीपक जाधव यांना कल्पना दिली. यावर जाधव यांनी संबंधित टेम्पोचालकाला तेथेच थांबण्यास सांगितले व आलेल्या कुटुंबातील व्यक्तींनी एकमेकांपासून अंतर ठेवून राहण्यास सांगितले. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक विजय वाघमारे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्राथमिक चौकशी करून टेंपोचालकाला सोडून दिले तर अनोळखी कुटुंबांना त्यांच्या मूळ गावी पाठवले. या ठिकाणी वास्तव्याला असणाऱ्या काही कुटुंबांना मात्र येथेच ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, काल कारवाई करत पोलिसांनी सुमारे १५० गाड्या जप्त केल्या. मग वास्तविक लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्या व्यक्तींवर संचारबंदीचे उल्लंघन केल्याबाबत गुन्हे नोंद करण्यात आले नाहीत. बाहेरून रात्रीच्या वेळी पोलीस बंदोबस्त असताना टेंपो गावात कसा आला ? तसेच आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाइन करणे व त्यांची वैद्यकीय तपासणी करणे गरजेचे असताना याबाबत काहीही उपाययोजना पोलिसांनी केल्या नाहीत. तसेच या प्रकरणात नियमाप्रमाणे कारवाई करण्यात आली नसल्याचे मत येथील काही जणांनी व्यक्त केले.