पाटबंधारे विभागाचा फुटला मानवतेचा बांध तरुण बुडल्याची तक्रार करूनही आवर्तन थांबविण्यास प्रशासन हतबल
नागरिकांनी आचारसंहिता पाळण्याची गरज
नीरा : प्रतिनिधी
पिंपरे खुर्द (ता.पुरंदर) येथील ओंकार संजिवन गायकवाड (वय २५) हा युवक बुडल्याची भीती व्यक्त करूनही तातडीने पाऊले न उचणाऱ्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कारभाराबाबत येथील नागरिकांनी तीव्र असंतोष व्यक्त केला.
ओंकार हा मित्रांसह नीरा डाव्या कालव्यात पोहण्यासाठी गेला होता. ते काही वेळाने दिसून न आल्याने सहकारी मित्रांनी आरडाओरडा करत शोधाशोध केली असता परिसरात आढळून आला नाही. नीरा पाटबंधारे विभाग कालव्याचे आवर्तन थांबवण्यास असमर्थ असल्याचे दिसून आले.
कामा धंद्या निमित्ताने गावाबाहेरील लोक लॉकडाऊन मुळे सध्या गावाकडे आहेत. उन्हाचा चटका वाढल्याने पिंपरे (खुर्द) नारळीच्या मळा येथील युवक पोहण्यासाठी नीरा डावा कालव्यात दुपारी दोनच्या सुमारास गेले होते. दरम्यान, संचारबंदीचे उल्लंघन आता जीवावर बेतू शकते हे यानिमित्ताने अधिरेखीत झाले आहे. दहा ते पंधरा युवक पोहण्याचा मनसोक्त आनंद घेत होते. अचानक ओंकार दिसुन न आल्याने युवकांनी शोधाशोध सुरू केली. त्याचे कपडे, चप्पला आदी साहित्य कालव्याच्या काठावर असल्याने तो याच परिसरात असण्याची शक्यता असल्याने युवकांनी शोधमोहीम सुरू केली आहे. गावातील तरबेज पोहणा-यांनी ही शोध मोहीमेत सहभाग घेतला आहे.
नीरा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना या घटनेची कल्पना देण्यात आली. कालव्याचे पाणी थांबवता येते का असे विचारले असता तसे करता येत नाही. गंभीर घटना असताना वरिष्ठ अधिकारी फोन स्विच ऑफ करुन निवांत असतात. लोकप्रतिनिधींना या घटनेची माहिती देण्याचा प्रयत्न स्थानिक करत आहेत. पण कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत नाही.