गुळुंचे गावात आओ जावो, घर तुम्हारा संचारबंदी व लॉक डाऊनचे तीन तेरा; रोज इतर तालुका व जिल्ह्यातून लोकांची ये जा सुरू

Pune Reporter

गुळुंचे गावात आओ जावो, घर तुम्हारा
संचारबंदी व लॉक डाऊनचे तीन तेरा; 
रोज इतर तालुका व जिल्ह्यातून लोकांची ये जा सुरू

नीरा -प्रतिनिधी सनी निगडे 

  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने जाहीर केलेले लॉक डाऊन व संचारबंदी कायदा, साथ रोग कायदा गुळुंचे (ता.पुरंदर) येथे पुरता धाब्यावर बसविण्यात आला आहे. गावात आपत्ती व्यवस्थापन समिती केवळ कागदोपत्री असून आजही अनेकजण इतर जिल्ह्यातून व तालुक्यातून ये जा करत असून सरपंच, ग्रामसेवक व इतर सदस्य कोणतीही कारवाई करताना दिसत नाहीत. त्यामुळे गुळुंचे येथे आओ जावो, घर तुम्हारा अशी परिस्थिती दिसून येत आहे.
    काही दिवसांपूर्वी गावात देऊळवाले समाजाचे काही लोक लॉक डाऊनचे उल्लंघन करून पहाटे गावात आले होते. आता मात्र त्यांचे नातेवाईक पुन्हा संचारबंदीत गावात आले आहेत. यातील एक महिला १० दिवसांपासून गावात वास्तव्याला आली असून तिला लपवून ठेवण्यात आल्याची धक्कादायक माहिती आज उघडकीला आली आहे. याबाबत विचारणा करायला गेलेल्या  पोलीस पाटील व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली. बारामती, पुणे तसेच सातारा जिल्ह्यातून अनेकजण ये जा करत असताना त्यांना थांबविण्यात गावातील पदाधिकारी सपशेल अपयशी ठरले आहेत. एकीकडे कोरोना गावाच्या उंबरठ्यावर उभा असताना दुसरीकडे मतांची पोळी भाजून खाण्यासाठी कुणी कुणाला दुखवयाचे नाही असा नवा नियम कोरोना काळात घातला जात आहे.
#जाहिरात

    बाहेरून येणाऱ्या व्यक्तीला येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत अलग ठेवावे असा कागदोपत्री निर्णय घेण्यात आला होता.मात्र, त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. शाळांच्या खोल्या केवळ दिखाव्याला ठेवण्यात आल्या असून बाहेरून ये जा करणाऱ्यांना केवळ नोटीस देण्याचे कागदोपत्री काम सुरू आहे. पोलीस प्रशासनही नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवर कारवाई करत नसल्याने गावातील तरुण आता पुरते वैतागले आहेत. पोलीस, महसूल, ग्रामविकास कर्मचारी व आपत्ती व्यवस्थापन समितीचे सदस्य असतानाही बाहेरील गाव, तालुका, जिल्ह्यातून लोक येत असून आपल्या परिवारात मिसळत असल्याने ही धोक्याची घंटा आहे.
    बाहेरून ये जा करणाऱ्यांची माहिती मिळाल्यास त्यांच्यावर अंकुश ठेवण्याचे प्रभावी उपाय हातात घेण्यासाठी समितीने कडक पावले उचलण्याची मागणी होत आहे.

तहसीलदारांनी लक्ष घालण्याची मागणी -
गावात गेल्या आठवड्यापासून नव्याने आलेल्या व ये जा करत असलेल्या व्यक्तींवर संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात यावी तसेच बाहेरून येणाऱ्या व्यक्तींचे शाळेतच अलगीकरन करण्यात यावे यासाठी आता पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी आदेश देण्याची मागणी गावातील लोकांकडून होत आहे. तसेच ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणाने बाहेरून येणाऱ्या व्यक्तीकडून गावात कोरोनाची लागण झाल्यास त्याला पंचायतीला जबाबदार धरावे असे मत आता व्यक्त होत आहे.
To Top