पॅरेलवर सुटलेल्या आरोपीचा खून: निरा येथील घटना
नीरा : प्रतिनिधी
नीरा (ता.पुरंदर) येथील दगडेवस्तीतील विवाहीत युवकाने नात्यातील विवाहित महिलेवर बलात्कार केल्याचा संशयीत आरोपी पॅरेलवर सुटला होता. तो वस्तीत दिसल्याने पिडितेच्या जवळच्या नातेवाईकांनी त्या युवकाला विषारी औषध पाजुन मारहाण करत ठार मारुन, प्रेताची परस्पर विल्हेवाट लावली आहे. मंगळवारी घडलेल्या घटनेची फिर्याद शुक्रवारी रात्री उशिरा मयत युवकाच्या मुलीने दाखल केली आहे. चारही संशयित आरोपींना जेजुरी पोलीसांनी ताब्यात घेतले असून. त्यांची कसुन चौकशी सुरू आहे.
जाहिरात
जेजुरी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवार दि.१५ रोजी फिर्यादी कु.सिद्धी बाबा (उर्फ चेंड्या) दगडे वय-१४वर्ष रा नीरा (ता.पुरंदर) हीने जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये वडिलांचा खुन केल्याची फिर्याद दाखल केली आहे. मंगळवारी दि.१२ मे रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास नीरा (ता.पुरंदर) दगडेवस्ती येथील बाबा (उर्फ चेंड्या) भिवाजी दगडे यांना ठार मारल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. फिर्यादी यांचा चुलत चुलता विक्रांत वसंत दगडे, चुलत आजी शारदा वसंत दगडे दोघे राहणार दगडे वस्ती नीरा, चुलत आत्या अपर्णा चंद्रकांत वळकुंदे, चुलत दाजी करण (उर्फ अमर) चंद्रकांत वळकुंदे रा. कोळेवस्ती यांनी एकत्र येऊन फिर्यादी यांची चुलत आजी यांचेवर फिर्यादीच्या वडिलाने बलात्कार केल्याचे कारणावरून मनात राग धरून विषारी औषध पाजून लाकडी बॅट, लाकडी दांडक्याने मारहाण करून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने खून केला आहे. त्यानंतर फिर्यादीच्या वडिलांचे प्रेत नीरा नदी येथे नेऊन परस्पर विल्हेवाट लावली आहे. या मजकुरचे फिर्यादीवरुन जेजुरी पोलीसांत गुन्हा शुक्रवारी रात्री उशिरा दाखल करण्यात आला आहे.
मयत युवकाला यापूर्वी बलात्काराच्या गुन्ह्यात वडगाव निंबाळकर पोलीसानी २५ नोव्हेंबर २०१९ रोजी अटक केली होती. त्याची येरवडा कारागृहात रवानगी केली होती. कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून गुन्हेगारांना पॅरेलवर सोडण्यात आले होते. दगडे हा ही पॅरेलवर ३ एप्रिल रोजी आपल्या घरी आला होता. तो मोकाट दिसल्याने बलात्कार पिडीतेच्या जवळच्या नातेवाईकांना राग अनावर झाला व त्याला मारहाण करत विषारी औषध पाजुन जिव जाई पर्यंत ठार मारले. याची कुठे माहिती दिली तर तुला सुद्धा जिवे मारून टाकिन अशी धमकी फिर्यादीस दिली. त्यानंतर मृतदेह टेंपो मध्ये भरुन नीरा नदीच्या काठावरील स्मशान भुमित विल्हेवाट लावली. या घटनेतील आरोपींंना गजाआड करण्यासाठी जेजुरीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार नंदकुमार सोनवलकर, पोलिस नाईक राजेंद्र भापकर, पोलिस हवालदार सुदर्शन होळकर, पोलिस हवालदार गोविंद भोसले, पोलीस कॉन्स्टेबल निलेश जाधव यांनी सहभाग घेतला. या घटनेचा तपास नीरा पोलीस दुरक्षेत्राचे फौजदार विजय वाघमारे करीत आहे.
शहरी भागात स्मशान भुमीत रखवालदार असतात. तसेच रखवालदार मोठ्या गावात ही ठेवणे आता गरजेचे झाले आहे. कोणी कुठुनही (अनोळखी) मृतदेह अंत्यविधीसाठी कोणत्याही गावातील स्मशानभूमीत घेऊन येत असल्याचे निदर्शनास येत आहे. गावातील जरी मृतदेह असला तरी त्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आहे का हे तपासणे स्थानिक प्रशासनाचे काम आहे. मृत्यू कसाही घडो शवविच्छेदन करणे गरजेचे आहे. त्याशिवाय मृत्यूचा दाखला देणे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे यापुढे एक रखवालदार कायमस्वरूपी स्मशानभूमीत असणे गरजेचे असल्याची नीरेत दबक्या आवाजात चर्चा होती.