सासवड पोलिसांची दिवसभरात ४७१ वाहनचालकांवर कारवाई करून ९९ हजार रुपयांची दंड आकारणी
पुरंदर प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांची वर्दळ थांबावी म्हणून पोलिसांकडून अनेक उपाय योजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. आज सासवड आणि परिसरामध्ये पोलिसांनी केलेल्या कारवाईत ४७१ वाहनचालकांवर वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करून त्यांच्याकडून ९९ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्याकडून संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानुसार पोलिसांनी आज सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने यांच्या नेतृत्वाखाली विविध ठिकाणी नाकाबंदी केली होती. त्यामध्ये श्रीनाथ चौक, दिवेघाट, हिवरे रोड फाटा, नारळी बाग या विविध पॉईंटवर वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये ४७१ लोकांवर कारवाई करण्यात आली. यामधून ९९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्याचबरोबर गेल्या महिन्यामध्ये सासवड पोलिसांनी ३२७२ केसेस दाखल केल्या त्यातून ७,४६,००० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी दरम्यान सासवड पोलिस स्टेशन ट्राफिक पोलीस नाइक ज्योतिबा भोसले यांनी उत्तम कामगिरी केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
सासवड परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सहकार्य करावे अत्यावश्यक गरज असेल तरच घराचे बाहेर पडावे. अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडताना वाहतुकीचे नियम पाळावेत. असे आवाहन पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. आजच्या कारवाई मध्ये पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक बारामती विभाग, उपविभागीय पोलिस अधिकारी भोर पुरंदर यांच्या मार्गदर्शनाखाली सासवड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डी. एस. हाके, सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल घुगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने, पोलीस शिपाई रमेश कर्चे, निलेश जाधव, दत्ता जाधव, कैलास सरक, कानतोडे, जाधव, कुंभार, पोलीस शिपाई तसेच होमगार्ड व ट्रॅफिक वॉर्डन यांची यांनी सहभाग घेतला.
पुरंदर तालुक्यातील सासवड या तालुक्याच्या ठिकाणी पोलीस धडक कारवाई करत आहेत याचे लोक स्वागत करत आहेत. अशीच कारवाई जेजुरी पोलीसांनी ही त्यांच्या कार्यक्षेत्रातील मोठ्या गावात करणे अपेक्षित आहे. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर खेडेगावातील लोका चारचाकी व दुचाकीवरून खरेदीसाठी गर्दी करत आहेत. लग्नसराई सुरू असलेल्याने लोक खरेदीच्या निमित्ताने दुकानात येत आहेत. जेथे लग्नाला पन्नास माणसांची परवानगी आहे. तर एका ठिकाणी लग्नाच्या कापड खरेदीसाठी (बस्ता बांधन्यासाठी) दुकानात तब्बल दोन्ही बाजुंकडून शंभर लोक आल्याची चर्चा परिसरात केली जात आहे. तर दुकानदाराने या सर्वांना चहापाणी केले.