अण्णासाहेब जाधव यांना केंद्रीय गृहमंत्रालयाचे अंतरिक सुरक्षासेवा पदक जाहीर
पुरंदर : प्रतिनिधी
भोर-पुरंदर उपविभागीय पोलिस अधिकारी (डी.वाय.एस.पी) अण्णासाहेब जाधव यांना केंद्रीय गृह मंत्रालया मार्फत दिले जाणारे आंतरिक सुरक्षा सेवा पदक नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. सोमेश्वर रिपोर्टरने लवकरच जाधव यांना बढती किंवा पदक मिळेल असे सोमवारी सुचवले होते.
आण्णासाहेब जाधव यांनी गडचिरोली जिल्ह्यातील नक्षली भागात अॉगस्ट २०१५ ते ऑगस्ट २०१७ या कालावधीत उपविभागीय पोलिस अधिकारी या पदावर कार्यरत असताना नक्षलवाद्यां विरोधात कारवाया करून तेथील जनतेमध्ये महाराष्ट्र शासन व पोलिसांच्या विषयी विश्वास निर्माण करून जनता व पोलिस यांच्यामध्ये संबंध सुधारले. या उल्लेखनीय कार्याची केंद्रीय गृहमंत्रालयाने दखल घेऊन त्यांना आंतरिक सुरक्षा सेवा पदक जाहीर केले आहे.
यापुर्वी आण्णासाहेब जाधव यांना गडचिरोली येथील उल्लेखनीय कार्यामुळे सन २०१८ मध्ये पोलिस महासंचालकांचे सन्मान चिन्ह, सन २०१९ मध्ये राज्य सरकारने विशेष सेवा पदक बहाल करून सन्मानित करण्यात आले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचा आंतरिक सुरक्षा सेवा पदक जाहीर झाल्याबद्द्ल पुरंदर तालुक्यातील सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. सोमवारी पुरंदर तालुका पत्रकार संघ व सोमेश्वर रिपोर्टरने जाधव यांना रियल कोरोना हिरो सन्मानपत्र देऊन सन्मानित केले होते. त्यावेळी पुरंदर तालुका प्रतिनिधींनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले व त्यांना लवकरच बढती किंवा पदक मिळेल असे सुचवले होते. सोमेश्वर रिपोर्टरचा हा अंदाज खरा ठरल्याचे जाधव यांनी आज फोनवरून पुरंदर तालुका प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
COMMENTS