पुणे निवासी असलेला पुरंदर तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यु
पुरंदर :
पुरंदरच्या तहसील कचेरीत आता कोरोनाने थेट शिरकाव केला आहे. मागील महिन्यात तहसील कार्यालयातील एक कर्मचारी पॉझिटिव्ह आला होता. त्याच्यावर उपचार झाल्यानंतर तो निगेटिव्ह झाला व पूर्ण आराम घेऊन तो सध्या कामावर रुजू आहे. मात्र पुणे शहरातील निवासी असलेला दुसरा एक कर्मचारी मागील दोन दिवसांपासून आजारी होता. नुकताच त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला व त्याचा मृत्यू आज सोमवारी झाला. त्यामुळे आता तहसील कचेरीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खुद्द तहसील कचेरीतीलच कर्मचारी कोरोनाने मृत झाल्याने आता प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
तहसील कार्यालय पुरंदर येथिल एक कर्मचारी कालपासून दवाखान्यात उपचारासाठी दाखल होते. ते आज मयत झालेत. त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. असे त्यांच्या घरच्यांनी पुरंदर प्रशासनाला कळविले आहे. सदर कर्मचारी पुणे येथे राहणारे होते. त्यांच्या जाण्याने महसूल विभागाने एक प्रामाणिक, मन लावून चांगले कांम करणारा कर्मचारी गमावला आहे. पुरंदर तहसीलचेही त्यांच्या जाण्याने नुकसान झाले आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयातील जे खूप आवश्यक आहे ते कामकाज सुरू राहील. तथापी तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की खूप आवश्यक असेल तरच शासकीय कार्यालयात यावे. विनाकारण गर्दी करू नये असे आव्हान पुरंदरच्या प्रशासनाकडून करण्यात आले आहे.