'सोमेश्वर'च्या कोविड सेंटरचे घोडे अडले कुठे? दहा दिवस उलटूनही अजून निर्णय नाही
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्याच्या पश्चिम भागातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या सोमेश्वरनगर या ठिकाणी कोविड सेंटर होणार होते. ग्रामीण भागातील रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने ते अत्यावश्यक बनले आहे. मात्र दहा दिवस उलटून गेले तरी याबाबत अजून कोणताही निर्णय झाला नाही. सेंटरसाठी जागा उपलब्ध होत नसल्याचे बोलले जात आहे. सेंटर सुरू करण्यायाबाबत नेमक्या कोणत्या विभागाची उदासीनता आहे याचे कोडेच अजून नागरिकांना समजले नाही.
दहा दिवसापूर्वी प्रशासन, जिल्हा परिषद, सोमेश्वर कारखाना तसेच सर्व गावातील सरपंच, ग्रामसेवक यांची बैठक दि १३ रोजी मुरूम या ठिकाणी पार पडली होती. या बैठकीत सर्वानुमते सोमेश्वरनगर या ठिकाणी कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आज दहा दिवस उलटूनही या कोविड सेंटर ला कोण खो देत आहे याबाबत नागरिकांच्यात उलट सुलट चर्चा सुरू आहेत. या बैठकीला बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, सोमेश्वर चे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष संभाजी होळकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे, राजवर्धन शिंदे, सभापती नीता बारावकर, उपसभापती प्रदीप धापटे, सदस्या नीता फरांदे, विक्रम भोसले, सोमेश्वर चे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांच्यासह सर्व गावातील सरपंच, उपसरपंच, आरोग्य सेवक उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेतून सोमेश्वरनगर याठिकाणी कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या दृष्टीने विविध इमारतीची पाहणी देखील करण्यात आली होती. यावेळी बोलताना सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी सांगितले होते की, या सेंटर साठी ज्याकाही प्राथमिक सुविधा लागतील त्या सुविधा सोमेश्वर कारखाना पुरवण्यासाठी तयार आहे तर जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे यांनी या सेंटरसाठी लागणारा सर्व स्टाफ तयार असून जागेची उपलब्धता होताच लवकर हे सेंटर सुरू केले जाणार आहे असे स्पष्ट केले होते.
या बैठकीत प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, आरोग्य अधिकारी मनोज खोमणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संभाजी होळकर तसेच सोमेश्वर चे माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे यांनीही या कोविड सेंटर साठी एकमताने दुजोरा दिला होता. शिवाय कोरोना टेस्टदेखील सुरू केली जाणार होती. त्या बातमीने लोकांना मोठा दिलासा मिळाला होता. मंग घोडं नक्की कुठं पेंड खात आहे. याबाबत बारामती पश्चिम भागातील नागरिक संभ्रमात आहेत. विशेष म्हणजे निंबुत, वणेवाडी, मुरूम, होळ, करंजे, मुर्टी, करंजेपुल या दिग्गज नेत्यांच्या बड्या गावांमध्येच जास्त संख्येने रुग्ण सापडत आहेत. तरीही सेंटर सुरू होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. लोकांना बारामतीला टेस्टसाठी आणि उपचारासाठी जावे लागत आहे.
COMMENTS