अपक्ष उमेदवार प्रा. प्रकाश पवार यांनी साधला मु सा काकडे महाविद्यालयातील शिक्षकांशी संवाद
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य विधान परिषद निवडणूक २०२० च्या पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार प्रा. प्रकाश मारुती पवार यांनी येथील मु. सा. काकडे महाविद्यालयातील वरिष्ठ, कनिष्ठ आणि व्यावसायिक अभ्यासक्रम विभागातील शिक्षक मतदारांशी आज मुक्त संवाद साधला.
प्रा. प्रकाश पवार हे फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे येथे उपप्राचार्य असून तर त्यांना राज्यशास्त्र या विषयाचे गाढे अभ्यासक आहेत. त्यामुळे त्यांना लोकशाही मुल्यांची आणि त्यातूनच शिक्षकांना असलेल्या अधिकारांची सखोल जाण आहे. 'शिक्षकांना आपले प्रश्न मांडता यावेत आणि बुद्धिजीवी वर्गाच्या ज्ञानाचा समाज आणि शिक्षणाच्या विकासासाठी उपयोग व्हावा या हेतूने या मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली परंतु अपवाद वेगळता या मतदार संघातून निवडणूक गेलेल्या आमदारांनी आजपर्यंत राजकीय पक्ष आणि संस्थाचालक यांच्या निष्ठा जपण्यातच धन्यता आणली त्यामुळे शिक्षणाच्या प्रश्नांकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले. त्यातूनच विनाअनुदानित संस्था, भरतीचा अनुशेष, शिक्षण सेवक,जुनी पेन्शन योजना रद्द, वेतन निश्चितीतील आणि बढतीतील दिरंगाई, शालाबाह्य कामे असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले. त्याचा शिक्षक आणि शिक्षण या दोन्हीवर विपरीत परिणाम झाला असून शिक्षक आमदारांना काही देणे घेणे नाही', असे मत त्यांनी व्यक्त केले.
प्रा. प्रकाश पवार हे शिक्षक संघटक या संघटनेच्या माध्यमातून गेली २५ कार्यरत असून त्यांनी दीड हजारहुन अधिक शिक्षकांचे वयक्तिक प्रश्न सोडविले आहेत. शाळेच्या दाखल्यावर आईचें नाव, निवडणुकीच्या दिवशी कर्तव्य बजावलेल्या शिक्षकांना दुसऱ्या दिवशी सुट्टी, तासिका तत्त्वावरील शिक्षकांचे मानधनात वाढ, पेपर तापसणीसाठीच्या मानधनात वाढ, यासारखे अनेक प्रश्न त्यांनी धसास लावले असून तसे शासन निर्णय निर्गमित करण्यासाठी त्यांनी शासनाला भाग पाडले आहे.
भविष्यात सर्व स्तरातील शिक्षकांच्या संघटनांना संघटित करून जुनी पेंशन योजना सुरू करण्यासाठी, शिक्षण सेवक पद रद्द करण्यासाठी आणि शालाबाह्य कामातून शिक्षकांची सुटका करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगून त्यांनी आपल्याला पहिल्या क्रमांकाचे पसंतीचे मत देऊन विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले.
ब। प्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणेचे सिनेट सदस्य प्रा. देविदास वायदंडे, डॉ. जया कदम, स्पुक्टोचे जिल्हा सचिव प्रा. प्रवीण ताटे-देशमुख, प्रा. निलेश आढाव इतर शिक्षक वृंद उपस्थित होते. सर्वांनी प्रा. प्रकाश पवार यांना विजयी करण्यासाठी एकदिलाने प्रयत्न करू असा निर्धार व्यक्त केला.