महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्याने कुटुंबासारखे काम करावे - सुप्रिया सुळे
भोर : प्रतिनिधी
महाविकास आघाडी सरकार तीन पक्षाचे असूनही चांगल्या पद्धतीने राज्याचा कारभार करत आहे. अशाच प्रकारे बारामती मतदारसंघातील महाविकास आघाडीतील प्रत्येक कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी सुद्धा कुटंबासारखे काम करावे, कोण आले कोण राहिले याकडे जादा लक्ष देण्याची गरज नसल्याचा चिमटा अनुपस्थित कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांचे नाव न घेता काढला.
पुणे पदवीधर मतदारसंघ महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड व शिक्षक मतदारसंघ महाविकास उमेदवार प्रा. जयंत आसगांवकर यांच्या प्रचारार्थ प्रचार मेळावा नसरापूर ( ता. भोर ) येथे मेळावाप्रसंगी भोर आणि वेल्ह्यातील कॉंग्रेसचे पदाधिकारी अनुपस्थित राहिले होते. यावर सुळे यांनी चिमटा काढत उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे, राष्ट्रवादीचे चंद्रकांत बाठे, संतोष घोरपडे, संतोष रेणुसे, भालचंद्र जगताप, विक्रम खुटवड, लहुनाना शेलार, गणेश बागल, नितीन धारणे, स्वप्नील कोंडे, शिवसेनेचे ज्ञानेश्वर शिंदे, शैलेश वालगुडे, नारायण कोंडे, गणेश धुमाळ, आदित्य बोरगे, हमीद मुलाणी आदी उपस्थित होते.
महाविकास आघाडीचे सरकार असलेले मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे चांगल्या पद्धतीने राज्याचा कारभार पाहत असून अशा महाविकास आघाडीच्या पदवीधर उमेदवारांना निवडून देण्यात शिवसेनेचा खारीचा वाटा असेल अशी ग्वाही जिल्हाप्रमुख रमेश कोंडे यांनी दिली. यावेळी प्रदीप गारटकर, गणेश निगडे ज्ञानेश्वर शिंदे शैलेश वालगुडे आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रास्तविक संतोष रेणुसे सूत्रसंचालन गणेश खुटवड यांनी केले.
मेळाव्याला कॉंग्रेसची दांडी
महविकास आघाडीच्या पदवीधर उमेदवारांच्या प्रचारार्थ कार्यकर्ता मेळाव्यात कॉंग्रेसचे पदाधिकारी नेत्यांनी अनुपस्थित राहिले असल्याचे दिसून आले. तर जाहीर भाषणात शिवसेनेचे तालुकप्रमुख ज्ञानेश्वर शिंदे यांनी कॉंग्रेसच्या दांडीबाबत नाराजी व्यक्त केली.