सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील मु सा काकडे महाविद्यालय, सोमेश्वरनगर येथील करिअर मार्गदर्शन आणि प्लेसमेंट सेल यांच्यावतीने नुकतेच मानवाधिकार या शीर्षका अंतर्गत झूम अँप द्वारे वेबिनार चे आयोजन करण्यात आले होते. या वेबिनार मध्ये ऑनलाइन सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी न्यायमूर्ती श्री संदीप स्वामी, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभाग सहसचिव, जिल्हा कायदेशिर सेवा प्राधिकरण, रायगड अलिबाग, आणि न्यायमूर्ती श्री अभिजीत डोईफोडे, तृतीय दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभाग, अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, कोपरगाव हे देखील ऑनलाईन उपस्थित होते. पहिल्या सत्रामध्ये न्यायमूर्ती श्री संदीप स्वामी यांनी आपला विद्यार्थी ते न्यायाधीश हा प्रवास विद्यार्थ्यांना सांगितला. तदनंतर महिलांविषयक कायदे या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी महिलांविषयी असलेले विविध कायदे व त्यातील तरतुदी यांचे स्पष्टीकरण विद्यार्थ्यांना दिले. पहिल्या सत्रामध्ये प्रमुख पाहुण्यांचा परिचय IQAC, समन्वयक डॉ. संजू जाधव यांनी करून दिला व डॉ. दत्तात्रय डुबल यांनी आभार मानले.
वेबिनार च्या दुसऱ्या सत्रामध्ये न्यायमूर्ती अभिजीत डोईफोडे यांनीही आपला विद्यार्थी ते न्यायाधीश हा प्रवास विद्यार्थ्यांना कथन केला व त्यानंतर सायबर कायदा या विषयावरती विद्यार्थ्यांना पावरपॉइंट प्रेझेंटेशन च्या द्वारे मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी सायबर गुन्हे रोखण्यासाठी तसेच इंटरनेट वरील आपली वैयक्तिक माहिती कशा पद्धतीने गोपनीय ठेवता येईल याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या वेबिनार मध्ये महाविद्यालयाचे अध्यक्ष सतीश काकडे संस्थेचे सचिव प्रा. जयवंतराव घोरपडे, सहसचिव सतीश लकडे हे ऑनलाइन उपस्थित होते. याप्रसंगी संस्थेचे सचिव प्रा. जयवंतराव घोरपडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या वेबिनार चे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक जवाहर चौधरी यांनी केले. तसेच वेबिनारचे यशस्वी आयोजन व सूत्रसंचालन करिअर मार्गदर्शन व प्लेसमेंट सेलचे समन्वयक प्रा. नारायण राजूरकर यांनी केले. दुसऱ्या सत्राचे आभार कार्यक्रमाचे तांत्रिक सहाय्यक रजनीकांत गायकवाड यांनी मानले.