खंडोबाचीवाडी ग्रामपंचायत बिनविरोध : सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत घेतला निर्णय
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील खंडोबाचीवाडी गावातील सर्व पक्षाच्या व सर्व गटांच्या लोकांनी आज एकत्र येत ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गावाचा खर्च वाचविण्यासाठी, भविष्यातील मतभेद टाळण्यासाठी व बक्षीस मिळविण्यासाठी हा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. ग्रामस्थांनी चौदा जणांची समिती नियुक्त केली असून ती सात सदस्य लोकशाही पध्दतीने चर्चेव्दारे निवडणार आहे.
खंडोबाचीवाडी या ग्रामपंचायतीची १९८६ पासून आजपर्यंत फक्त एकदाच म्हणजे सन २००० मध्ये बिनविरोध निवडणूक झाली होती. निंबूत ग्रामपंचायतीत तत्पूर्वी ही ग्रामपंचायत होती. त्यानंतरही काकडे गट व राष्ट्रवादीचा गट किंवा राष्ट्रवादीतलेच दोन गट असा संघर्ष पहायला मिळत होता. त्यामुळे छोट्या असलेल्या खंडोबाच्यावाडीची निवडणूक प्रतिष्ठेची बनत होती. या छोट्याशा गावात कारखाना, पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे सदस्यपद मिळालेले आहे. यामुळे आता संघर्षापासून गाव दूर जायचे म्हणत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाभरात बिनविरोध निवडणुकांना बक्षीसेही जाहिर केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर आज बिनविरोध निवडणुकीच्या दिशेने ग्रामस्थांनी प्रयत्न केले. आज सोमेश्वर कारखान्याच्या गेस्ट हाऊसवर शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे, सोमेश्वर कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष शैलेश रासकर, माजी उपाध्यक्ष लक्ष्मण गोफणे, समता पतसंस्थेचे अध्यक्ष दिलीप फरांदे, सोमेश्वरचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मदने, दादा मदने, दादा लकडे, बाळासाहेब महानवर, धनंजय गडदरे, अनिल लकडे, अशोक किसनराव मदने पाटील, गणेश पवार यांच्यासह शंभरच्या आसपास ग्रामस्थ उपस्थित होते..
आताची निवडणूक बिनविरोध करायची. त्यासाठी सात सदस्य निवडावे लागणार आहेत. यासाठी चौदा जणांची समिती तयार केली असून ही समिती आजपासूनच वार्डनिहाय इच्छुक लोकांच्या बैठका घेणार आहे आणि या बैठकांनंतर लोकशाही पद्दतीने सदस्याची निवड करणार आहे. आतापर्यंत ज्यांना संधी मिळालेली नाही अशाच नव्या तसेच सुशिक्षित चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. आणि जे गावाच्या निर्णयास विरोध करतील त्यांना संपूर्ण गाव विरोध करेल, असा निर्णय झाला असल्याची माहिती सोमेश्वर कारखान्याचे उपाध्यक्ष शैलेश रासकर व माजी उपाध्यक्ष लक्ष्मण गोफणे यांनी दिली.
दरम्यान, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती प्रमोद काकडे यांनी, ग्रामस्थांच्या बिनविरोध निवडणुकीच्या निर्णयावर समाधान व्यक्त करत स्वतःच्या जिल्हा परिषद फंडातून दहा लाख रूपये बक्षीस देणार असल्याचे असे जाहिर केले. याशिवाय अजितदादा, सुप्रियाताई यांच्याकडूनही बक्षीस प्राप्त करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत असे ग्रामस्थांनी सांगितले.
दरम्यान २३ तारखेला अर्ज भरण्याची सुरवात आहे. तत्पूर्वी सदस्य निवडणाऱ्या समितीपुढे सर्वांच्या अपेक्षां समजून घेणे आणि त्यातून निवड कऱण्याचे आव्हान आहे. हे आव्हान पेलत खंडोबाचीवाडी तालुक्यातील पहिली बिनविरोध ग्रामपंचायत होऊ शकेल अशी शक्यता वर्तविली जात आहे.
COMMENTS