सोमेश्वरनगर ची एटीएम 'असून अडचण, नसून खोळंबा'

Admin
सोमेश्वरनगर ची एटीएम 'असून अडचण, नसून खोळंबा'

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

सोमेश्वरनगर परीसरातील राष्ट्रीयकृत आणि जिल्हा बॅंकेची सर्वच एटीएम केंद्रे वारंवार बंद राहत असल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. येथील एटीएम म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी म्हणण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे.एकीकडे 

राष्ट्रीयकृत बॅंका आपल्या ग्राहकांसाठी दर्जेदार सेवा देण्यासाठी प्रयत्नशील असताना या परीसरातील बॅंका मात्र ग्राहकांना सेवा देण्यास टाळाटाळ करत आहेत.

        सोमेश्वरनगर परीसरात मोठी व्यापारपेठ आहे. विविध गावातून आणि कामांसाठी येणाऱ्या नागरीकांची संख्या मोठी आहे. याठिकाणी बॅंक ऑफ बडोदा, कार्पोरेशन बॅंक, आयसीआयसीआय तसेच जिल्हा बॅंकेची शाखा आहे. मात्र चौकातील मोठी असलेली बॅंक ऑफ बडोदाचे एटीएम गेल्या आठ दिवसांपासून बंद असल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे. एटीएम मध्ये पैसे नसणे, पैसे भरण्याच्या मशिन बंद आहेत. एटीएम बंद असल्याने बॅंकात गर्दी होत आहे. लांबपर्यंत रांगा लावून ग्राहकांना पैसे काढावे लागत आहेत. शैक्षणिक संकुल, सोमेश्वर साखर कारखाना,  हॉस्पिटल, विविध महाविद्यालये यामुळे विद्यार्थी आणि शेतकऱ्यांची याभागात वर्दळ सुरु असते. सोमेश्वर कारखाना कामगार व सभासद यांचे पगार पैसे येथील जिल्हा बॅंकेत जमा करते. तातडीने पैसे काढता यावेत यासाठी एटीएम फायदेशीर ठरते मात्र येथील एटीएम बंद राहत असल्याने त्या शोभेच्या वस्तू ठरत आहेत. याबाबत परीसरातील ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली असून तातडीने एटीएम पुर्ण क्षमतेने सुरु करण्याची मागणी केली आहे. 
To Top