बारामतीतील मध्यवर्ती ठिकाणची पाच दुकाने फोडली : घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Admin
बारामतीतील मध्यवर्ती ठिकाणची पाच दुकाने फोडली : घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद


बारामती- प्रतिनिधी

बारामती शहरातील मध्यवर्ती ठिकाणी पाच दुकाने फोडून रोख रक्कम लंपास केली आहे. सदर चोरी शहरातील शिवाजी चौकात घडली असून सदर चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.शहरातील शिवाजी चौका लगत असणाऱ्या सुखशांती अपार्टमेंट येथील कलर पेंट, चप्पल, डिझाईनिंग,आईस्क्रीम पार्लर अशी सलग पाच दुकाने एकाच रात्री फोडल्याची घटना समोर आली आहे. अज्ञात चोरट्यांनी दुकानातील रोख रक्कम चोरून आईस्क्रीम फस्त केल्याचे दिसून येत आहे.
गॅस कटरने फोडली दुकाने....
काल मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने शिवाजी चौकातील गजबजलेल्या ठिकाणी चोरांनी ही धाडसी चोरी केली आहे. आज सकाळी नेहमीप्रमाणे दुकाने उघडत असताना दुकाने फोडल्याचे निदर्शनास आले. दुकान मालकांनी सदर प्रकरणी पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली. शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. व सदर चोरीप्रकरणी अज्ञात चोरट्यांंविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.

चोरी दरम्यान आईस्क्रीम केले फस्त.......

एकाच रात्री सलग पाच दुकाने फोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम लंपास केली. या पाच पैकी एक आईस्क्रीम पार्लरचे दुकान फोडून आईस्क्रीम वरही डल्ला मारला.शहरातील गजबजलेल्या ठिकाणी झालेल्या चोरीमुळे शहरातील लहान-मोठ्या व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. 
To Top