राजगड पोलिसांचा गुन्हेगारीवर वचक : ९५ टक्के गुन्ह्यांचा तपास

Admin
राजगड पोलिसांचा गुन्हेगारीवर वाचक : ९५ टक्के गुन्ह्यांचा तपास

भोर : प्रतिनिधी
माणिक पवार

कोरोना महामारीच्या काळात अपुरी मनुष्यबळ असताना सुद्धा गुन्हेगारीवर वचक ठेऊन  गंभीर गुन्ह्यातील आरोपींना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली राजगड पोलिसांनी जेरबंद करण्यात यश मिळविले असून वार्षिक गुन्ह्याची संख्या स्थिर राहिली असल्याची पोलीस निरीक्षक विनायक वेताळ यांनी माहिती देत नागरिकांनी सुद्धा सजग राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
पूर्ववैमनस्याचे वाद, भावबंदकीतील वाद, खून, प्राणघातक हल्ले, बलात्कार, विनयभंग, दरोडा अशा गुन्ह्याची मालिका राजगड पोलिसांच्या सतर्कतेने आटोक्यात राहिली आहे. नसरापूर ( ता. भोर ) येथील राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ८७ गावे असून गेल्यावर्षी २०१९ मध्ये ठाण्यात २३० अशी गंभीर गुन्ह्यांची नोंद होती. यावर्षी ३१ डिसेंबर २०२० अखेर २३१ गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली आहे. राजगड ठाण्यात २६७ किरकोळ गुन्ह्याची नोंद ठाण्याच्या  दप्तरी असून एकूण २६७ प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. गंभीर गुन्ह्यातील सराईत आरोपीना जेरबंद करून पोलिसांनी गुन्हेगारीवर वचक ठेवल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.
     गुन्हे विभागाच्या महिला पोलीस हेमा भुजबळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजगड ठाण्याच्या हद्दीतील २०२० अखेर पर्यंतची गुन्ह्याची आकडेवारी पुढीलप्रमाणे - खून – ४, खुनाचे प्रयत्न – १०, सदोषमनुष्यवध - १, बलात्कार – ८, दरोडा - ३ दरोडा तयारी – ०, घरफोडी – १३, जबरी चोरी – २, चोऱ्या – ४०, विश्वासघात – ३, गर्दी मारामारी – २६, अपहरण – ३, ठकबाजी ६, जातीवाचक शिवीगाळ – ३, अपक्रिया – ०, दुखापती – ३३, सरकारी नोकरास मारहाण - ४, विनयभंग – १३, अपघातातील मयत ३१ व जखमी ३२,  आत्महत्या – २, जुगारबंदी – ४, दारूबंदी – २८, इतर – १३, यासह किरकोळ २६७ गुन्हे दाखल असून पोलिसांनी वर्षभरात ३६५ प्रतिबंधक कारवाई केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीकाळात ३३७ उल्लंघन गुन्हे, तर विनामास्क फिरणारे तब्बल ६ हजार ६५९ जणांवर दंडात्मक कारवाई करून १२ लाख ६८ हजार ८०० दंड वसूल केले असल्याची माहिती गोपनीय विभागाचे भगीरथ घुले यांनी दिली.

आरोपी ठेवायचे कुठे?....
राजगडच्या हद्दीत लोकसंख्या प्रचंड असल्याने रोजच घातपात वाढत आहे. तसेच या हद्दीतून राष्ट्रीय महामार्ग गेला असल्याने अपघातवर नियंत्रण ठेवण्यासाठी हातातील कामे सोडून महामार्गावर पोलिसांना धाव घ्यावी लागते. पोलिस ठाण्याला अपुरी जागा असल्याने रोज घडणाऱ्या घटनेतील गुन्ह्यातील आरोपींना ठेवण्यासाठी जागा नसल्याने भोर पोलीस ठाणे अथवा पुणे येथे नाहक पळापळ करावी लागत असल्याने पोलिसांना समस्यांचा सामना करावा लागत आहे.

 ‘पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख व उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील  यांच्या मार्गदर्शनाखाली गंभीर गुन्ह्यातील आरोपीना जेरबंद करण्यात राजगड पोलिसांना यश आले आहे. गंभीर गुन्ह्यावर वचक ठेवण्यासाठी शोधमोहीम प्रभावीपणे राबवत असून नागरिकांनी सुद्धा सहकार्य करणे अपेक्षित आहे.
 विनायक वेताळ, पोलिस निरीक्षक, राजगड पोलिस ठाणे
To Top