लसीकरणापासून राज्यात एकही बालक वंचित राहू नये : उपमुख्यमंत्री अजित पवार
बारामती : प्रतिनिधी
राज्यातून, देशातून पल्स पोलिओचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम नियमित राबवण्यात येत आहे, आज उद्घाटन झालेल्या लसीकरण मोहिमेत ५ वर्षांपर्यंतच्या प्रत्येक बालकाला लस पाजण्यात यावी, एकही बालक लसीकरणापसून वंचित राहू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत पाच वर्षांपर्यंतच्या बालकांना प्रतिबंधक लस पाजण्याच्या जिल्हास्तरीय लसीकरण मोहिमेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज बारामती महिला रुग्णालयात बालकांना पोलिओ डोस पाजून झाला. त्यावेळी उपमुख्यमंत्री बोलत होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले की, पुणे जिल्हयात मोहिमेत सुमारे ११ लाख ३२ हजार ३५१ बालकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार आज जिल्ह्यात ६ हजार ७०० बुथवर लसीकरण करण्यात येत आहे. ६ हजार २५४ पथकांच्या मदतीने गृहभेटी देऊन लसीकरणाची मोहिम राबवण्यात येत आहे. आपल्या घरच्या, शेजारच्या, परिसरातल्या पाच वर्षांपर्यंतच्या प्रत्येक बालकाला लस पाजली जाईल, याची खात्री करावी, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले.
बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, पंचायत समितीच्या सभापती नीता बारवकर, जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ.चेतन खाडे, डॉ. शिंपी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, विशेष कार्य अधिकारी हनुमंत पाटील, बारामती रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे आदी यावेळी उपस्थित होते.
COMMENTS