कोऱ्हाळे बु l च्या सरपंचपदी रवींद्र खोमणे यांची वर्णी लागण्याची शक्यता
सोमेश्वरनगर - प्रतिनिधी
हेमंत गडकरी
कोऱ्हाळे बुद्रुक ग्रामपंचायतीचे सरपंच पदासाठीचे आरक्षण काल जाहीर झाले असून निवडणुकीआधी निघालेली सर्वसाधारण गटाची सोडत कायम राहिल्याने जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश खोमणे यांचे पुतणे व युवा नेते रवींद्र खोमणे यांचा सरपंच होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रवींद्र खोमणे हे पंचक्रोशीत सोन्याबापू नावाने परिचित असल्याने 'कोऱ्हाळे बुद्रुक ग्रामपंचायतीला येणार सोन्याचे दिवस' असे मेसेज काल दिवसभर सोशल मीडियावर फिरत होते.
कोऱ्हाळे बुद्रुक ग्रामपंचायतीची सत्ता मागील काळात सोमेश्वर चे संचालक सुनील भगत यांच्याकडे होती. मागील निवडणुकीत 15 पैकी तब्बल अकरा जागा त्यांनी जिंकल्या होत्या. मात्र या निवडणुकीत त्यांना सपाटून मार खावा लागला. केवळ चार जागांवर त्यांचे उमेदवार विजयी झाले. तर पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश खोमणे यांच्या गटाने आठ जागा जिंकत पूर्ण बहुमत मिळवले होते. निवडणुकीच्या आधी जाहीर झालेल्या सरपंच पदाच्या सोडतीत गावचे सरपंचपद सर्वसाधारण गटासाठी राखीव झाले होते. मात्र जाहीर झालेली सोडत रद्द झाल्याने आता नेमक्या कोणत्या प्रवर्गाची सोडत मिळते याकडे कोऱ्हाळेकरांचे लक्ष लागून राहिले होते. सतीश खोमणे यांच्या गटाकडे सरपंच पदासाठी सर्व प्रवर्गातील उमेदवार होते मात्र केवळ अनुसूचित जाती महिला या प्रवर्गातील उमेदवार निवडून आला नव्हता. भगत गटाकडे मात्र या प्रवर्गातील उमेदवार असल्याने गावची सत्ता गेली तरी सरपंचपद आपल्याकडे येणार अशी अपेक्षा भगत गटाला होती. तर दुसरीकडे खोमणे गट सुद्धा चिंतेत होता.
मात्र काल नव्याने झालेल्या सोडतीत गावचे सरपंचपद पुन्हा एकदा सर्वसाधारण गटासाठी आरक्षित झाल्याने गटाने आनंदोत्सव साजरा केला. सतीश खोमणे यांचे पुतणे रवींद्र खोमणे यांना सरपंच पद मिळणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असून ती पंचक्रोशीत सोन्याबापू नावाने परिचित असल्याने 'कोऱ्हाळेकरांना येणार सोन्याचे दिवस' असे मेसेज काल पंचक्रोशीतील सोशल मीडिया वरती फिरत होते.
............
पाच वर्षे एक च सरपंच ठेवा..ग्रामस्थांची इच्छा
मागील काळात भगत गटाचे जवळपास अकरा सदस्य निवडून आले होते. त्यापैकी दहा सदस्यांची सरपंच व उपसरपंचपदी निवड करण्यात आली होती. त्यामुळे काहींना या पदावर काम करण्यासाठी केवळ एक किंवा दोन महिने मिळाले. तर काहींना केवळ नावासाठी सरपंच व उपसरपंचपद हवे होते. त्यामुळे गावच्या विकासाला खीळ बसत असल्याची भावना ग्रामस्थांनी उपस्थित करत किमान यावेळी तरी गावच्या सर्वांगीण विकासासाठी पाच वर्षांसाठी एकच सरपंच असावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
..........