भोरमध्ये पक्षाचा आदेश डावलणाऱ्या सदस्यासावर व्हीपची अंमलबजावणी होणार?
माणिक पवार
भोर : प्रतिनिधी
भोर पंचायत समिती सभापती निवडणुकीत पक्षाने अधिकृत ठरवलेल्या उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी करुन पक्षाच्या व नेत्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आयत्यावेळी इतर सदस्यांना सभापती करण्यात आल्याने भोर राष्ट्रवादीमधील बंडाळी पुन्हा चव्हाट्यावर आली असून व्हीपची अंमलबजावणी होणार का? असा सवाल होत आहे.
सभापती श्रीधर किंद्रे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी गुरुवारी भोर पंचायत समिती सभागृहात निवडणुक झाली एकुण सहा सदस्या पैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे चार सदस्य असुन राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व आहे शेवटच्या वर्षासाठी सदस्य लहुनाना शेलार यांनी सभापती पदाची संधी देण्याचे पक्षांतर्गत ठरले होते त्या नुसार किंद्रे यांच्या राजीनाम्या नंतर शेलार यांनी तयारी केली मात्र आज प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी शेलार यांच्या बरोबरच विद्यमान उपसभापती दमयंती जाधव यांनी देखिल सभापती पदासाठी अर्ज दाखल केला त्यांना माजी सभापती श्रीधर किंद्रे यांनी साथ दिल्याने त्यांना बळ मिळाले. शिवसेनेच्या सदस्या पुनम पांगारे यांनीही सभापतीपदासाठी अर्ज दाखल केला होता.
दरम्यान, सरुवातीलाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्षांनी सर्व चारही सदस्यांना पक्षाच्या अधिकृत उमेदवार लहुनाना शेलार यांना मतदान करण्याचा आदेश (व्हीप) बजावला होता तो डावलत माघारीची मुदत संपुऩही दमयंती जाधव यांनी उमेदवारी अर्ज मागे न घेता उमेदवारी कायम ठेवली व शिवसेनच्या पुनम पांगारे यांनीही उमेदवारी कायम ठेवली. तीन उमेदवार असल्याने मतदान घेण्यात आले हात उंचावुन मतदाना मध्ये प्रथम दमयंती जाधव यांचे नाव निवडणुक निर्णय अधिकारी यांनी पुकारले व त्यांना मतदान करणारया सदस्यांना हात उंच करण्यास सांगण्यात आले यावेळी दमयंती जाधव, श्रीधर किंद्रे याराष्ट्रवादी सदस्यांसह शिवसेनेच्या पुनम पांगारे, काँग्रेसचे रोहन बाठे यांनीही हात उंचावुन जाधव यांना मतदान केले सहा पैकी चार मतदान जाधव यांना होत आहे हे पाहून शेवटी राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार लहुनाना शेलार व दुसऱ्या सदस्या मंगल बोडके यांनीही हात उंचावुन जाधव यांना मतदान केले अशा प्रकारे सहा मते घेऊन दमयंती जाधव सभापती झाल्या.
राष्ट्रवादी सदस्यांनी आदेश डावलण्याची ही तीसरी वेळ आहे मागील एका वेळेसे रणजित शिवतरे, शैलेश सोनवणे यांनाही असाच अनुभव आला आहे. शैलेश सोनवणे यांनी तेव्हा पासुन राष्ट्रवादीला रामराम केला या निवडणुकीने लहुनाना शेलार यांना हा अनुभव आला व राष्ट्रवादीच्या फाटाफुटीची तिसरया वेळेस पुनरावृत्ती झाली. या नाट्यमय घडामोडी नंतर नवनिर्वाचित सभापती दमयंती जाधव यांनी आम्ही सर्व सदस्यांनी सर्वसहमतीने निर्णय घेऊन ही निवडणुक पार पाडली असुन सहा महिन्यानंतर मी राजीनामा देणार असून शेलार यांना सभापतीपदाची संधी देणार असल्याचे ग्वाही दिली. तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे यांनी बोलताना सांगितले की, आमची सुद्धा इच्छा होती की, शेलार यांची निवड व्हावी. मात्र दमयंती जाधव यांची निवड बहुमताने झाली असून शेलार यांनी देखील जाधव यांना मत दिले आहे. शेलार यांच्यावर पक्ष अन्याय करत नसून सभापती निवड प्रक्रिया बाबत वरिष्ठांना कळविले असल्याचे घोरपडे यांनी सांगितले.
बाईट - 'पक्षादेश डावलुन बंडखोरी झाल्याने पक्षाचे व नेत्यांची प्रतिष्ठा गेली होती ती प्रतिष्ठा अजुन जाऊ नये म्हणुन शेवटच्या क्षणीही संयम बाळगून मी व मंगलताई बोडके यांनीही बंडखोर उमेदवारांना मतदान करुन पक्षाचे नाव वाचवण्याचा प्रयत्न केला आहे, पक्षादेश डावलणारयांवर पक्ष काय कारवाई करतो याकडे आमचे लक्ष आहे व पुढील ऩिर्णय सर्व कार्यकर्त्यांच्या भावना विचारात घेऊन घेणार आहे
- लहुनाना शेलार, पंचायत समिती सदस्य