वाणेवाडी येथील ग्रामस्थांनी बंद पाडलेल्या रस्त्याचे काम सुरू करण्याच्या सूचना
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज-------
वाणेवाडी (ता. बारामती) येथील हनुमान मंदिर परीसरात सुरु असलेल्या रस्त्याचे काम निकृष्ट होत असल्या कारणाने ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी नुकतेच बंद पाडले. दरम्यान बारामती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी मोहन खोसे यांनी भेट देत चांगले काम करण्याच्या सूचना ठेकेदाराला दिल्या आहेत.
या रस्त्याची गेल्या १५ वर्षापासून दुरुस्ती झाली नव्हती. २५/ १५ लेखा शीर्षकाअंतर्गत फंडातून या रस्त्यासाठी सुमारे २० लाख रुपये निधी मंजूर झाला होता. लाखो रुपयांचा निधी मिळूनही दर्जेदार काम होत नसल्याने ग्रामस्थांनी या रस्त्याचे काम बंद पाडले. संबंधित ठेकेदाराने रस्ता उकरला असून यामध्ये दगडी खडी न टाकता थेट क्रॉंकिट टाकण्याचे नियोजन केल्याने हे काम बंद पाडले. निकृष्ट काम होत असल्याने याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे थेट तक्रार करणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी मोहन खोसे यांनी संबंधित रस्ता कामाच्या ठिकाणी भेट देत गुरुवार (दि.४) पासून दर्जेदार काम करण्याबाबत संबंधित ठेकेदाराला सूचना केल्या असल्याचे सांगितले. तीनशे मीटर अंतर असलेल्या या रस्त्यासाठी वीस लाख रुपये निधी मिळूनही दर्जेदार काम होत नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्यानेच अशी निकृष्ट दर्जाची कामे होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. राजकीय दृष्ट्या महत्वाच्या असलेल्या वाणेवाडी गावातील विकासकांसाठी सुमारे सव्वादोन कोटी रुपये निधी जिल्हा परिषद आणि शासनाच्या माध्यमातून मंजूर झाला आहे. मात्र काही ठेकेदार, सदस्य आणि ग्रामस्थ निकृष्ट काम करण्यास प्रोत्साहन देत असल्यानेच कामाचा दर्जा ढासळत आहे. यावर सार्वजनिक बांधकाम आणि जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
.......लगेच अधिकाऱ्याचा ठेकेदाराला फोन
वाणेवाडीतील या कामावर बारामती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी खोसे यांनी पाहणी केली. याबाबत पत्रकारांनी त्यांना माहिती घेण्यासाठी फोन केला असता दुसऱ्याचा मिनिटाला त्या ठेकेदारांचे पत्रकारांना फोन येऊ लागले.
COMMENTS