उमेदवारी मिळविण्यासाठी मला भेटायला पुणे मुंबईला येवू नका : उपमुख्यमंत्री अजित पवार
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज-------
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झालेली आहे. अनेकांनी उमेदवारी द्यावी यासाठी मागणी घातली आहे त्यासाठी शेकडो अर्ज माझ्याकडे आले आहेत. अर्ज छानणी नंतर प्रत्येक गटाची यादी लागेल यानंतर अर्ज माघारी घेऊन त्याठिकाणी पॅनेलचा विचार होईल. अर्ज माघार घेतल्यानंतरच उमेदवारी बाबतीत निर्णय घेण्यात येईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
बारामती येथील बारामती तालुका खरेदी विक्री संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. लोकशाही असल्याने कोणीही विविध पॅनेलकडून उमेदवारी भरु शकते. सोमेश्वर कारखाना १९९२ पासून आपल्या ताब्यात आहे. पाच गटात २१ जणांना संधी मिळणार आहे. चार तालुक्यात कार्यक्षेत्र असल्याने त्या- त्या तालुक्यातील पक्षाच्या नेत्यांशी बोलून संधी देण्यात येईल. मेळावा घेऊन राष्ट्रवादी पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचा माझा प्रयत्न असतो मात्र सध्या वेळेचे बंधन आहे. ८ मार्चला राज्याचा अर्थसंकल्प मांडायचा असल्याने यानंतर सोमेश्वरला मेळावा घेण्याचे सुचोवात पवार यांनी केला. सोमेश्वरकडे अतिरिक्त ऊस आहे यासाठी दौंड शुगरला ऊस पाठवून वेळेत गाळप करण्याच्या सूचना पवार यांनी यावेळी दिल्या. कारखान्याकडील वीजेला मागील सरकारने कमी पैसे दिले आपले सरकार आल्यानंतर जास्त दर दिला असल्याचे पवार यांनी सांगितले.
.सोमेश्वरच्या निवडणुकीत जुन्या नव्यांचा मेळ घालून तरूण व सुशिक्षित उमेदवारांना उमेदवारी देण्याचा मानस पवार यांनी व्यक्त करत सर्वांबरोबर समन्वय साधण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सुचोवात केले. उमेदवारी मागण्यासाठी मला भेटायला पुणे मुंबईला येवू नका असे अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना आपल्या स्टाईल मध्ये सुनावले.