आदेश नसताना काम सुरु करुन ग्रामस्थांवर अन्याय :
वादग्रस्त धांगवडी उड्डाणपुलाचे पोलीस बंदोबस्तात काम सुरु
माणिक पवार
भोर : प्रतिनिधी
गावच्या मूळ ठिकाणी धांगवडीफाटा ( ता. भोर ) येथे उड्डाणपूल होण्यासाठी ग्रामस्थांनी गेल्या अनेक वर्षात मागणी स्वरुपात आंदोलने केली होती. मात्र याला पूर्णतः राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केराची टोपली दाखविली आहे. गावच्या लांब अंतरापासून वादग्रस्त व रखडलेल्या उड्डाणपुलाचे काम ठेकेदारांनी पोलीस बंदोबस्तात सुरु करण्यात आले असून विरोध करणाऱ्या ग्रामस्थांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सातारा - पुणे महामार्गावरील धांगवडी ( ता. भोर ) येथील वादग्रस्त उड्डाणपूलाचे काम अनेक वर्षापासून रखडलेले होते. आज मंगळवारी दि. २ पासून पोलीस बंदोबस्तात काम सुरु करण्यात आले असून अचानक सुरु झालेल्या कामाची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी जावून विरोध करण्याचा प्रयन्त केला. यावेळी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. अनुचित प्रकार घडू नये यासाठी राजगड पोलीस अधिकारी, कर्मचारी, आरसीपी पथक, दोन पोलीस वाहन असलेले पिंजरे व अग्निशमन दल तैनात करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक विनायक वेताळ यांनी सांगितले.
दरम्यान, धांगवडीफाटा येथेच उड्डाणपूल न करता चुकीच्या ठिकाणी उड्डाणपुलाचे काम असल्याने अपघातात अनेक प्रवांशी आणि जनावरांचे जीव गेले आहे. याबाबत येथील ग्रामस्थांनी अनेकवेळा उपोषणे, आंदोलन केली होती. मात्र दाद न मिळाल्याने ग्रामस्थांनी न्यायालयाचे दार ठोठावले होते. अखेर ग्रामस्थांनी १४ नोव्हेंबर २०१८ रोजी गळफास उपोषण केले होते. त्यावेळी एनएचआयचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस यांनी मूळ ठिकाणी उड्डाणपूल होण्यासाठी लेखी सकारात्मक आश्वासन दिले होते. याबाबत आजच्या सुरु झालेल्या कामाबाबत विचारणा केली असतात सुहास चिटणीस टाळाटाळ करून अधिक न बोलता भ्रमणध्वनी कट केला. मात्र अद्याप ग्रामस्थांच्या मागणीचा विचार होत नसल्याने प्रशासनाबाबत नाराजीची चर्चा झडत आहे.
उड्डाणपुल प्रकरणी गोविंद तनपुरे,केशव तनपुरे व ग्रामस्थ यांनी उच्च न्यायालयात दाद मागीतली आहे याबाबत महामार्गाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणिस यांनी २० जानेवारी २०२० रोजी भोर प्रांताधिकारी यांना पत्र पाठवुन या उड्डाणपुला बाबत ग्रामस्थ न्यायालयात गेले आहेत सदर न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल असे म्हंटलेअसून न्यायालया कडुन कोणताही आदेश झालेला नसताना काम सुरु करुन ग्रामस्थांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.