करंजे ते निंबुत छपरी या दोन किमी लच्या रस्त्यामुळे एक हजार एकर शेती रस्त्याचा प्रश्न मिटणार

Admin
करंजे ते निंबुत छपरी या दोन किमी लच्या रस्त्यामुळे एक हजार एकर शेती रस्त्याचा प्रश्न मिटणार

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील करंजे ते निंबुत छपरी हा गेली चाळीस-पन्नास वर्षातील रस्ता ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्या पुढाकारातून सुरू झाल्याने तब्बल दोनशे शेतकऱ्यांच्या सुमारे एक हजार एकराचा प्रश्न सुटणार आहे.
करंजे (ता. बारामती) येथील ओढ्यापासून निंबुत छप्री गावच्या हद्दीपर्यंत असलेल्या वनविभागतील हा रस्ता मात्र यावरून वाहतूक करता येत नव्हती, रस्त्यात दगड, राडारोडा त्यामुळे या रस्त्याच्या कडेला असलेल्या तब्बल एक हजार एकर शेतीचा प्रश्न निर्माण झाला होता.  मागील पंचवीस-तीस वर्षात या भागात काही शेतकऱ्यांच्या विहीरी झाल्या तर काही शेतकऱ्यांनी उपसा सिंचन योजना राबवून कालव्यावरून पाणी पोचविले. बहुतांश क्षेत्र बागाईत झाले आहे. हा विकास होत असताना दुसरीकडे अतिक्रमणामुळे रस्तादेखील जवळपास संपला होता. जमीनी भिजत्या झाल्याने उसासारखी पिके शेतकरी घेऊ लागले परंतु रस्त्याअभावी उसासह सर्वच शेतमालाच्या वाहतुकीची हेळसांड कायम होती. बैलगाडी, ट्रॅक्टर अशी वाहनेच काय तर दुचाकी जाणेही अवघड झाले होते. थेट पाचशे एकर आणि अप्रत्यक्षरित्या पाचशे एकर असे शेतीक्षेत्र बाधीत झाले होते. रस्त्याच्या या गंभीर प्रश्नासाठी तहसीलदार विजय पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार गाव कामगार तलाठी दादासाहेब आगम, आजी-माजी सैनिक संघटना व काही उत्साही शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला. भीमरत्न बौध्द युवक संघटनेचेही याकामी सहकार्य झाले. बहुतांश शेतकरी बाधितच असल्याने लवकर एकी झाली. मोजणीदार बोलावून एकवीस फुटी रस्ता आखण्यात आला. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या शेतकऱ्यांचे बांध निश्चित करण्यात आले. काही शेतकऱ्यांनी चक्क पिकांमधून रस्ता देण्यास परवानगी दिली. दोन जेसीबीच्या सहाय्याने जवळपास एकवीस फुटाचा रस्ता नीटनेटका करून दोन्ही बाजूंनी चाऱ्या काढण्याचे काम पूर्ण झाले आहे. सत्तर ते ऐंशी शेतकऱ्यांनी मिळून स्वखर्चातून सुमारे दीड लाख रूपये आतापर्यंत खर्च केले आहेत. 

तहसीलदार विजय पाटील यांची भेट
बारामतीचे तहसीलदार विजय पाटील यांनी याठिकाणी भेट देत पुढील काळात शेतकऱ्यांचे काही प्रश्न असल्याचे सोडवण्याचे आश्वासन देत त्यांचे कामाचे कौतुकही केले तसेच या रस्त्याच्या मुरुमीकरणा साठी सहकार्य करणार असल्याचे सांगितले.
To Top