आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी २१ जागांसाठी रेकॉर्डब्रेक उमेदवारी अर्ज दाखल : सोमेश्वर कारखाना निवडणूक
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज---------
बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत आज अर्ज भरण्याची शेवटच्या दिवशी तब्बल ३८७ एवढ्या इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे २१ जागांसाठी आजअखेर तब्बल ६३८ एवढया जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असल्याने आता माघार कोण घेणार हा प्रश्न महत्वाचा ठरणार आहे.
यामध्ये सर्वात जास्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागण्यात आली आहे. राष्ट्रवादीकडून अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, जिल्हा परीषदेचे बांधकाम सभापती प्रमोद काकडे, सोमेश्वर चे माजी अध्यक्ष शहाजी काकडे,
दिग्विजय जगताप, गौतम काकडे, आनंदकुमार होळकर, सिध्दार्थ गीते, विक्रम भोसले, हनुमंत भापकर, शैलेश रासकर, सतीश सकुंडे, दत्ताआबा चव्हाण, लक्ष्मण गोफणे, अजिंक्य सावंत, ऋषी गायकवाड, राजेश चव्हाण, महेश जगताप,राजेश काकडे, तर शेतकरी कृती समितीच्या वतीने शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे यांच्यासह राहुल काकडे, अभिजीत काकडे, आप्पासो गायकवाड, शहाजी जगताप, प्रा बाळासाहेब जगताप, जालिंदर जगताप, अमर चव्हाण, कल्याण भगत या दिग्गजांसह ५५ इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
कारखान्याच्या इतिहासात प्रथमच भाजप सोमेश्वर कारखान्याच्या निवडणूकित उतरत असून भाजप आणि मित्रपक्षांनी मिळून ३५ उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिलीप खैरे, सोमेश्वर चे माजी संचालक पी के जगताप, बाळासो भोसले, विठ्ठल पिसाळ, खालील काझी,आदिनाथ सोरटे, हनुमंत शेंडकर, सोमनाथ राणे आदींचा समावेश आहे. यावेळी सोमेश्वर च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवारांनी सर्वात जास्त अर्ज भरले आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सर्वांना सामावून घेत ज्यांना उमेदवारी मिळाली नाही इच्छुकांची नाराजी दूर करावी लागणार आहे. उमेदवारी माघारी घेण्याच्या दोन दिवस अगोदर सर्व इच्छुक उमेदवारांशी अजित पवार संपर्क साधणार असल्याचे समजत आहे.
अजित पवार यांच्या आवाहनाला वाटाण्याच्या अक्षदा
आता राज्यात कोरोनाचे संकट अधिक गडद होत असताना आज सोमेश्वर कारखान्याचा निवडणुकीत आज भरण्याच्या शेवटच्या दिवशी इच्छुक उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात तोबा गर्दी केली होती. सकाळी १० वाजल्या पासूनच अर्ज भरण्यासाठी गर्दी करत रांगा लावण्यात आल्या होत्या.
प्रमोद काकडे- सभापती बांधकाम व आरोग्य जिल्हा परिषद पुणे
निवडुक निर्णय कार्यालयास लागोपाठ तीन दिवस सुट्टी असल्याने आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी काहीशी गर्दी झाली होती मात्र प्रांत कार्यालयाने सोशल डिस्टन्सचे नियम पाळत हे अर्ज स्वीकारले तसेच इच्छुक उमेदवारांनी देखील कोरोनाचे सर्व नियम पाळत अर्ज दाखल केले.