छोटी साहित्यसंमेलने उर्जेची मोठी स्त्रोत असतात - प्रा. रविंद्र कोकरे

Admin
छोटी साहित्यसंमेलने उर्जेची मोठी स्त्रोत असतात - प्रा. रविंद्र कोकरे

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

अखिल भारतीय साहित्य संमेलन हे साहित्यिकांना सर्वात एक मोठे व्यासपीठ असताना लोकांनी छोटी छोटी साहित्य संमेलने भरविण्याचा घाट का घालावा? त्यात नाहक ऊर्जा, वेळ आणि पैसा खर्च होतो असा एक सामान्य प्रवाह आहे. याला सडेतोड भूमिकेतून  प्रचलित विचारांना छेद देताना छोटी साहित्य संमेलने ही सामान्य माणसाच्या उर्जेची स्त्रोत आहेत. 
अशी ठाम भूमिका संमेलनाध्यक्ष प्रा.रवींद्र कोकरे यांनी आपल्या बीजभाषणांतून मांडली. अॕग्रो न्यूज यांचे वतीने मराठी राजभाषा दिनानिमित्त ४थे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन फलटण येथे आयोजित केले होते. साहित्य संमेलनामधून मराठी भाषा संवर्धनाचे काम मोठ्याप्रमाणावर होत असते. महाराष्ट्रात दर १० कि.मीवर भाषा बदलते त्यामुळे प्रत्येक भाषेतील गोडवा अनुभवने मोठे रंजक असते. साहित्य संमेलनातून चर्चा घडतात, विचारांची देवाणघेवाण होते व साहित्यिकांचे सन्मान होतात ज्यामुळे त्यांच्या लेखनीस बळ मिळते.असे प्रतिपादन ग्रामीण कथाकार व संमेलनाध्यक्ष प्रा.रवींद्र कोकरे यांनी केले.
              २७ तारखेला मराठी राज्यभाषादिनी फलटण येथील " हॉटेल आर्यमान " येथे रंगलेले हे साहित्य संमेलन कोरोना काळात धोका व आर्थिक भार सोसून जनतेची सेवा करणाऱ्या निस्वार्थी " कोविड योध्यांना समर्पित करण्यात आले होते. 
           या एकदिवसीय साहित्य संमेलनाचे प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य मा. जगन्नाथ शिंदे हे होते.त्यांनी कोविड योध्यांना समर्पित असणारे हे  संमेलन देशातील पहिले संमेलन असावे असे उदगार काढले. तसेच आपल्या उदघाटनपर मनोगतात त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकून त्यांना अभिवादन केले. 
                    कार्यक्रमाचे प्रास्ताविक संमेलनाचे स्वागताध्यक्ष  प्रा.महादेव गुंजवटे यांनी केले.  यावेळी व्यासपीठावर ॲग्रोन्युज परिवाराचे संस्थापक मा. प्रकाश सस्ते, मा. धैर्यशीलभाऊ देशमुख, अरविंदभाई मेहता, जेष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव व सासवडचे भूमीपुत्र असलेले बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानचे सुप्रसिद्ध कथाकार प्रा. विजय काकडे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. दत्ता जानकर यांनी केले. 
यावेळी २०२० सालात उत्कृष्ट साहित्यकृती निर्मिती करणाऱ्या साहित्यिकांचा सन्मान करण्यात आला यामध्ये , श्री. अरुण पुराणिक, डॉ. राजेंद्र खैरनार, लक्ष्मण जगताप, अंजली ढमाळ, माधुरी काकडे, केतन शिंदे यांना पुरस्कार देवून भूषविण्यात आले. जेष्ठ कवयित्री व यशोदीप प्रकाशन च्या प्रा. रुपाली अवचरे यांचा साहित्यसेवा पुरस्काराने सन्मान करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी छत्रपती संभाजी महाराजांचे कार्यकर्तृत्व व कोरोनातील भीषण वास्तव या विषयावर भव्य निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. यातील  विजेत्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्रे व सन्मानचिन्ह देवून सन्मान करण्यात आला.
               दुपारच्या सत्रात श्री.प्रकाश सकुंडे, अरुण कांबळे, प्रकाश कांबळे इत्यादी कवींचे बहारदार कवी संमेलन झाले. डॉ. जे. टी पोळ, निकोप हॉस्पिटल, डॉ. धनाजी जाधव, सुविधा हॉस्पिटल, डॉ.प्रशांत बनकर यांचा व फलटण नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांचा " कोविड योद्धा " पुरस्काराने सन्मान करण्यात आला.कोरोनाकाळात शेकडो प्रवाशांना अन्नदान करणारे श्री. अभिजित भोसले यांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. 
प्रा. विजय काकडे ,प्रा.गणेश नांदले, प्रा. रमेश आढाव यांच्या उपस्थितीत साहित्यसंमेलनाचा समारोप झाला. मा.श्री. प्रकाश सस्ते यांनी ॲग्रोवनच्यावतीने सर्वांचे आभार व्यक्त केले.
To Top