ऊस वाहतूक संघटना पुन्हा आक्रमक : परवडत नसल्याने ऊस वाहतूक थांबवण्याचा निर्णय

Admin
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज--------

बारामती तालुक्यातील सोमेश्वर साखर कारखान्यावरील ऊस वाहतूक संघटना पुन्हा आक्रमक झाली असून गेल्या दोन महिन्यांपासून ऊस वाहतूक वाढवण्याबाबत कारखाना प्रशासन तारीख पे तारीख देत
 असल्याने तसेच डिझेल चे भाव वाढल्याने ऊस वाहतूक संघटनेने येत्या चारपाच दिवसात ऊस वाहतूक करण्यास असमर्था दर्शविली आहे. 
          याबाबत आज सोमेश्वर कारखान्यावरील सोमेश्वर ट्रक ट्रॅक्टर ऊस वाहतूक संघटनेच्या कार्यालयात संघटनेचे अध्यक्ष प्रदीप काकडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. यावेळी कैलास मगर, नितीन जगताप, प्रभाकर जगताप, दत्तात्रय सोरटे, सागर वायाळ, राजेंद्र जगताप, मनोज होळकर, प्रदीप जगताप, विक्रम शिंदे, रामभाऊ गाढवे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. अध्यक्ष काकडे म्हणाले, दोन महिने झाले कारखाना प्रशासनाने वाहतूक वाढवण्याबाबत आश्वासन दिले असून याबाबत कोणतीही कार्यवाही केली नाही. कारखान्याचे गाळप साडेपाच लाख टन होते, आता साडेआठ लाख टन झालं आहे, मात्र कारखान्याने वाहतूक वाढवण्याबाबत  कोणतेही पाऊल उचलले नाही. दरम्यान आज सोमेश्वर कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांच्याशी बैठक झाली असून वाहतूक वाढवण्याबाबत इतर कोणत्याही कारखान्याची मागणी नाही असे स्पष्ट केले.
           ८० रुपये डिझेल असताना ऊस वाहतुकदारांना जी वाहतूक होती तीच वाहतूक आज  पण दिली जाते. आज डिझेल ९० च्या आसपास गेले आहे. त्यामुळे वाहतूक परवडत नाही. याबाबत कारखान्याने चार पाच दिवसात निर्णय घेतला नाही तर ऊस वाहतूकदार ऊस वाहतूक करण्यास असमर्थ असतील असे संघटनेने स्पष्ट केले आहे.
To Top