सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर कारखान्याच्या चालू गळीत हंगामात ऊस तोडणी कार्यक्रमावरून सद्या आरोप प्रत्यारोप सुरू आहेत याला नक्की जबाबदार कोण असा सवाल वाणेवाडीचे माजी सरपंच दिग्विजय जगताप यांनी केला आहे.
याबाबत दिग्विजय जगताप यांनी 'सोमेश्वर रिपोर्टर' ला दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हनटले आहे की, भाजपचे दिलीप खैरे यांनी संचालक मंडळावर आरोप केले आहेत की खाजगी कारखान्याचे हित जपण्यासाठी संचालक मंडळ विस्तारीकरण लांबवत आहे. संचालक मंडळाने पेपरच्या माध्यमातून सांगितले आहे की शेतकरी कृती समिती विस्तारीकरनास विरोध करत आहे. मात्र दुसरीकडे कृती समितीचे म्हणणे आहे की आमचा विस्तारीकरण विरोध नसून चुकीच्या विस्तारीकरणास आमचा विरोध आहे. या सर्व बाबींचा विचार करता २७ हजार सभासदांनी नक्की कोणावर विश्वास ठेवायचा? त्यामुळे सभासदांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. पुढील हंगामात निश्चितच यापेक्षा ऊसाचे क्षेत्र अधिक असणार आहे. म्हणून संचालक मंडळाने २७ हजार सभासदांच्या प्रपंचाचा विचार करता सर्व सभासदांना विश्वासात घेऊन कोरोनाचे संकट असल्याने सर्व सभासदांना जर बोलवता येत नसेल तर पाचही गटातील जेष्ठ सभासद, आणि कृती समितीला एकत्र घेऊन राजकीय जोडे बाजूला ठेवत २७ हजार सभासदांच्या प्रपंचाचा विचार करून विस्तारकरणाबाबत चर्चा करावी. त्याच बरोबर कारखान्याच्या अकाउंट विभागानेही कारखान्याची चालू आर्थिक परिस्थिती मांडणे गरजेचे आहे. कारण सद्या साखर उद्योग अडचणीतुन चालला आहे. येणे आणि देणे जुळले नाही तर मागाचेच दिवस पुन्हा येऊ नयेत. आधीच पाच ते सहा वर्षे सभासदांनी कमी दर घेऊन कारखान्यावरील कर्ज फेडण्यास मदत केली आहे. या सर्व बाबींचा विचार करता सभासदांच्या खिशाला कात्री न लावता विस्तारीकरण कशा प्रकारे करता येईल हे पाहणे महत्वाचे आहे. त्याच बरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आरोप करणाऱ्यांवर संचालक मंडळाने चोख प्रत्युत्तर देणे गरजेचे आहे.